अनुपम खेर यांना आला होता फेशिअल पॅरेलिसिसचा अटॅक!

    दिनांक :17-May-2019
कलाकार दिवस रात्र तहान भूक सगळे विसरून काम करीत असतात. बऱ्याचदा आपल्याला त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा पहायला मिळते. पण बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांचा हा किस्सा ऐकल्यानंतर तुम्हाला खरेच त्यांची कमाल वाटेल. 'हम आपके है कौन' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अनुपम खेर यांच्या चेहऱ्याच्या उजव्या भागावर लकव्याचा अटॅक आला होता आणि तरीदेखील त्यांनी घरी न थांबून चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
 
 

 
'हम आपके है कौन' सिनेमात त्यांनी माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांच्या पित्याची भूमिका साकारत होते. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानच त्यांना आपल्या या आजाराबद्दल कळले.
याबद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले की, ‘एक दिवस मी अनिल कपूरच्या घरी जेवत होतो तेव्हा अनिलच्या पत्नीने माझ्या उजव्या डोळ्याची पापणी खूप वेळ झाली हलत नसल्याचे पाहिले. त्यांनी मला याबद्दल विचारले. पण मी थकल्यामुळे कदाचित असे होत असावे असे मला सुरुवातीला वाटले. दुसऱ्या दिवशी ब्रश करताना मला जाणवले की तोंडातून आपोआप पाणी बाहेर पडत आहे आणि चेहराही थोडा वाकडा होत चालला आहे. त्यावेळी माझ्या बाजूला यश चोप्रा राहायचे. मी थेट त्यांचे घर गाठले. मी त्यांना विचारले की माझा चेहरा वाकडा झाल्यासारखा वाटतोय का?’
 
यश चोप्रा यांना मला झालेल्या आजाराची कल्पना आली आणि त्यांनी मला मुंबईतील प्रसिद्ध न्यूरो डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी मला फेशिअल पॅरालिसिसचा अटॅक आल्याचे सांगितले.