टाळू या ग्रीष्मदाह!

    दिनांक :17-May-2019
तभा ऑनलाईन टीम, 
आता उन्हाळा ऐन भरात आहे. ग्रीष्म भाजून काढायला लागला आहे. यंदा पाऊस उशिराने येणार आहे. आताचा ऊन नकोसं झालं आहे. अस्वस्थ वाटू लागलं आहे. चीडचीडही वाढली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे पाण्याची चिंता वाढली आहे. अशांत महत्त्वाचे असते आरोग्याची काळजी. उन्हाळ्यातही अनेक आजार येत असतात. आयुर्वेदानुसार उन्हाळा हा बलहानी करणारा ऋतू आहे. उन्हामुळे जमिनीवरचेच नाही तर शरीरातीलही पाणी कमी होते. थकवा येतो. अशक्तपणा वाढतो. काम करावेसे वाटत नाही. उत्साह नसतो. उन्हाळ्याच्या काळात शरीरातून घामावाटे जीवनावश्यक सोडियम पोटॅशियम, पाणी बाहेर टाकलं जातं आणि जीवनघटकांचा नाश होतो. यामुळे क्षयरोग, गोवर, कांजण्या, नागिणसारखे विकार होण्याचा धोका निर्माण होतो. विशेषत: शरीरातील जलद्रव्यांचा नाश झाल्याने उष्माघाताचाही धोका संभवतो.  
 
 
उन्हाळ्याच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सर्वांगाचा दाह होणे, अतिसार, लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. सतत घाम येण्यामुळे शरीराला दुर्गंधी तसेच विविध त्वचारोग होण्याची शक्यता असते. अंगावर घामोळ्या तसेच फोड्या येतात. कडक उन्हात जास्तकाळ काम केल्याने तसेच कडक उन्हात फिरण्याने शरीरात उष्णता वाढते आणि चेहरा तसेच अंगावरची त्वचा लाल किंवा काळसर होते. उष्माघाताने मृत्यू होतात. मुर्च्छा तर येतेच. उन्हाळ्याच्या दिवसांत निर्माण होणार्‍या व्याधी आणि त्यावरचे प्रथमोपचार यावर आपण मिमांसा करू. 
 
सर्वांगदाह- या व्याधीत संपूर्ण शरीराची आग होते. आणि चेहरा तसेच त्वचा निस्तेज होते. उत्साह कमी होतो. सर्वांगदाहाचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त थंड वातावरणात ठेवावं. एसी तसेच फॅन खाली ठेवावं. उन्हात जास्तकाळ फिरू नये. शरीर वरचेवर थंड पाण्याने पुसून घ्यावं.
 
उष्माघात- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला ग्लानी तसेच चक्कर येते. डोळ्यासमोर अंधार्‍या येतात. अशावेळी रुग्णाला थंड वातावरणात शांत झोपवावं. शरीर थंड पाण्यावे पुसून घ्यावं. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीतजास्त द्रव आहार द्यावा. अशा रुग्णांनी कडक उन्हाच्या वेळी घरातून बाहेर पडू नये. तसेच उष्माघात होत असलेल्या रुग्णाला घरात एकटे सोडू नये.
 
उष्माघाताची लक्षणे- ताप येतो, डोके दुखणे, डोळ्यांची आग, तहान लागते.
 
घरगुती उपाय-
  • थंड पाण्याचा वापर
  • कांद्याचा रस तळपायाला लावणे
  • लिंबू-पाणी अधिकाधिक पिणे
  • उन्हात घराबाहेर पडू नये
उष्माघात टाळण्यासाठी...
  • डोक्यास पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडा
  • उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नका
  • ताप असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या
  • टरबूज, कांदा, डांगर यांचा जास्त वापर करा
मुत्राघात- या व्याधीत लघवीला जळजळ होण्याचा त्रास होतो. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे लघवीत उष्णता निर्माण होते. आणि लघवीच्या जागेत दाह होतो. मुत्राघाताचा त्रास होणार्‍या व्यक्तींनी दिवसातून तीन ते चार वेळा लिंबू सरबत अवश्य प्यावं. तसेच नारळपाणी, कोकम सरबतही वरचेवर घ्यावं. एक चमचा जिरं-एक चमचा धने ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी हे मिश्रण गाळून घ्यावं आणि त्यात चमचाभर खडीसाखर टाकून प्यावं.
 
उलट्या-जुलाब- उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं मळमळण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच अतिसाराचाही त्रास होण्याची भीती असते. अशावेळी जास्तीतजास्त द्रवपदार्थ सेवन करावेत. त्याचप्रमाणे एक ग्लास पाण्यात दोन चमचे साखर आणि चिमूटभर मीठ टाकून दिवसातून चार ते पाच वेळा प्यावं. जुलाब होत असतील तर कपभर कोर्‍या चहात अर्ध लिंबू पिळून प्यावं.
 
त्वचाविकार- उन्हाळ्यातील सूर्याच्या लंबरूप किरणांमुळे त्वचेवर विपरित परिणाम होतात. त्वचा काळसर होते. त्यामुळे घराबाहेर पडताना तोंडाला रुमाल तसेच अंग झाकून ठेवावं. कपडे सैल असतील याची काळजी घ्यावी. बाहेर पडताना आयुर्वेदिक सनस्कीन लोशन लावावं. उष्णतेने शरीरातील रंगद्रव्यावर परिणाम होतो त्यामुळे त्वचा काळवंडते आणि चेहर्‍यावर वांग येतात. त्वचा कोरडी व निस्तेज होते. डोळ्यांना उन्हाच्या झळा लागून डोळ्यांवरही विपरित परिणाम होतात.
 
म्हणून बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा तसेच सनकोट वापरावा. सुती, मुलायम तसेच सौम्य रंगाची अर्था पांढर्‍या रंगाची कपडे वापरावी. पायात घट्ट बूट वापरणे टाळावे. त्वचा कोरडी पडू नये म्हणून उन्हाळ्यात जास्तीतजास्त पाणी प्यावं. तसेच फळांचं जास्तीतजास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध प्रकारच्या फळांचे रस तसेच आहारात काकडीचं प्रमाण वाढवावं. रात्री झोपताना संपूर्ण शरीराला थंड खोबर्‍याच्या तेलाने मालिश करावी. गोवर, कांजण्या आल्या असतील तर त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावं.
 
उन्हाळ्यातील आहार- उन्हाळ्यात पचायला हलका व लघु आहार घ्यावा. उन्हाळ्यात वात व पित्तदोषाची वृद्धी होत असते त्यामुळे या काळात वातुळ, पचायला जड, तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावं. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सिताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचं सेवन वाढवावं. तसेच थंड तुपाचाही आहारात समावेश करावा. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्तीत जास्त द्रवाहार करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा. फ्रीजमधलं अतिथंड पाणी पिण्यापेक्षा मटक्यातील सौम्य थंड पाणी प्यावं. लोणी, श्रीखंड, मावा, दही, पनीर, लस्सी शक्यतो टाळावं. मद्यसेवन पूर्ण वर्ज्य करावं.
 
उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी तसेच सायंकाळी बागेमध्ये गवतावर अनवाणी चालावं. रात्री झोपताना काश्याच्या वाटीने तळपाय चोळावेत. अंघोळीसाठी तसेच वापरासाठी थंड पाणी वापरावे. उन्हाळ्यात शक्य झाल्यास दिवसा थोडी झोप घ्यावी. तयामुळे शारीरिक तसेत मानसिक समाधान मिळतं.