महिलांवरील अत्याचार, समाज आणि कायदा!

    दिनांक :17-May-2019
गजानन निमदेव  
समाजात, ज्या देशात दर 78 मिनिटांनी एक हुंडाबळी जातो, दर 59 मिनिटांनी एक महिलेवर लैंगिक अत्याचार होतो, दर 34 मिनिटांनी बलात्काराचे एक प्रकरण घडते, दर 12 मिनिटांनी एका महिलेला शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागते आणि तीन मुलींपैकी एकीला हुंड्यासाठीचा मानसिक-शारीरिक छळ सहन करावा लागतो, तो देश आणि तो समाज स्त्रियांसाठी सुरक्षित आहे, असे म्हणता येईल का? उत्तर नकारार्थी येत असले तरी यासाठी सरकारी यंत्रणा नव्हे, तर आपली सामाजिक रचना आणि विविध प्रकारच्या रुढी-परंपरा, समाजाची बुरसट मानसिकताच जबाबदार आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये. वंशाचा दिवा म्हणून आजही मुुलाकडेच पाहिले जाते, मुलीला पोटातच ठार मारण्याचे कारस्थान केले जाते. मुुलगा होत नसेल तर स्त्रीला दोष दिला जातो आणि अनेकदा मुलगा व्हावा म्हणून स्त्रीला अनेक बाळंतपणांना सामोरं जावं लागतं. यात अनेक महिलांना प्राणही गमवावे लागतात. वास्तविक, मुुलगा किंवा मुुलगी होणं हा स्त्रीचा दोष नाही. पण, वैद्यक शास्त्राचं ज्ञान नसल्याने आपल्याकडे मुलीच्या जन्मासाठी स्त्रीलाच जबाबदार ठरवून तिच्यावर अत्याचार केले जातात. 21 व्या शतकातली साडेअठरा वर्षे संपत आली असतानाही परिस्थितीत बदल झालेला नाही आणि पुरोगामित्वाचा डांगोरा पिटणारे आम्ही सुधरायला तयार नाही.
  
आपल्यापैकी प्रत्येकाला आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, आत्या आहे, पत्नी आहे, मुुलगी आहे. त्यामुळे वाईट प्रसंग आपल्याही आईबहिणीवर गुदरू शकतो, याची जाण असूनही आपल्यापैकी अनेक लोक महिलांवर अत्याचार करतात, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याची आमची दृष्टीच स्त्रियांविरुद्धच्या अत्याचारास कारणीभूत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
गार्गी, मैैत्रेयी आणि सुलभा यांसारख्या विदुषी ज्या हिंदू समाजात जन्माला आल्या आणि आपल्या अचाट अशा कर्तृत्वाने त्यांनी या समाजावर, या राष्ट्रावर आपली अमिट अशी छाप उमटवली, या समाजाला दिशादर्शन केले, या समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित केला, त्या समाजाने स्त्रियांवर अत्याचार करावा, हे कदापि शोभणारे नाही. आपली हिंदू संस्कृती ही अतिशय प्राचीन आहे. असंख्य आघात होऊनही संस्कृती टिकून राहिली, ती समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांच्या योगदानामुळेच, ही बाब विसरता येईल? नाही. तरीपण आम्ही सगळे काही विसरून राक्षसासारखे वागत आहोत, याची आम्हाला ना लाज वाटत ना खंत! भारतीय समाजात स्त्रियांना अतिशय सन्मानाचे स्थान आहे, असे आम्ही छाती ठोकून सांगतो. स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले आहे, हेही आम्ही अभिमानाने सांगतो. मग, घरातल्या स्त्रीला लक्ष्मीप्रमाणे वागवत का नाही, तिला मानसन्मान का देत नाही, याचा विचार कधी करतो का? भारतीय समाजात स्त्रीपुरुष असा भेद कधीच केला जात नाही, स्त्री आणि पुरुष हे समान आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेही बोलले जाते. पण, हे सत्य आहे? स्त्री श्रेष्ठ आहे की पुरुष, असा तर प्रश्नच उपस्थित होत नाही. तरीही स्त्रियांवरच अत्याचार का केले जातात? स्त्रीची शारीरिक शक्ती पुरुषाच्या तुलनेत कमी पडते म्हणून की पुरुषांची मानसिकता सडकी आहे म्हणून? सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी, काली अशी स्त्रीची कितीतरी विविध रूपं आहेत, त्या सगळ्या रूपांची आम्ही पूजा करतो. लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून व्रतवैकल्य करतो आणि घरच्या लक्ष्मीला मात्र त्रास देतो.
 
ही कुठली आली संस्कृती? अभ्यासात गती यावी म्हणून सरस्वतीला पूजतो. पण, प्रत्यक्षात घरच्या सरस्वतीचा मानसिक-शारीरिक छळ करतो. हे कुठले लक्षण मानायचे? शक्ती दे म्हणून काली मातेकडे मागणं मागतो आणि घरच्या कालीचा शक्तिपात करतो. हे कुठले पौरुषत्व? जे काही भोगायचं ते स्त्रियांनीच, अशी आपली संस्कृती आहे का? नवरा मेला तर स्त्रीने वैधव्य स्वीकारायचं, पण त्या वैधव्याच्या नावाखाली पुरुषी अत्याचारही सहन करायचे? मुलगी झाली तरी तीच दोषी, घरात काही वाईट घटना घडली तरी ती कुलक्षणी, हे काय प्रकार आहेत? 21 व्या शतकाच्या बाता मारणारे आम्ही सुधरणार आहोत की नाही, सडकी मानसिकता बदलणार आहोत की नाही, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला हवा. कारण, तुम्हाला आणि मला, आपल्यापैकी प्रत्येकाला आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, याचे भान ठेवून तरी स्त्रियांचा सन्मान करायला शिकले पाहिजे.
 
समाजात स्त्रियांना विविध प्रकारच्या विरोधाभासी भूमिका निभवाव्या लागतात. एकच स्त्री ही कुणाच तरी मुलगी असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी पत्नी असते, कुणाची तरी सून असते, कुणाची तरी आई असते. समाजात सगळ्या बर्‍यावाईट प्रथांपरंपरांना ती सामोरं जात असते. घरात आणि बाहेर सगळ्या चांगल्या अपेक्षा फक्त तिच्याकडूनच केल्या जातात. सर्व विरोधाभासी भूमिका निभावण्यासाठीच ती या भूतलावर जन्याला आली आहे की काय, असे वाटावे एवढे कष्ट ती घेत असते. पतीला, सासूसासर्‍यांना, मुलांना तिच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. आपल्या परीने सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती कायम झटत असते. आणि असे झटत असताना तिच्या वाट्याला अनेक प्रकारचे अपमान येतात, अनेक संकटांना ती सामोरी जात असते. येणारा प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करण्याची तिची तयारी असते.
 
सर्व प्रकारच्या परिस्थितीत स्वत:ला ‘ॲडजस्ट’ करण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न असतो. स्त्रीने कायम पुरुषांवरच अवलंबून असावे, असा जणू तिचा समजच करून टाकलेला आहे आपल्या समाजाने. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिनेच घरातली सगळी कामं करायची असतात, हाही एक रूढ समज! खरे तर हा स्त्रीवर प्रचंड मोठा अन्याय आहे. एक चाकोरीबद्ध जीवन तिच्या वाट्याला आलं आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ज्या स्त्रियांनी शोधला त्या सुखी झाल्या असं शंभर टक्के म्हणता येणार नसले तरी चूल आणि मूल यात अडकलेल्य स्त्रियांपेक्षा निश्चितपणे त्या सुखी आहेत, हे नाकारता येणार नाही. 

 
 
राजस्थानात एक प्रकल्प चालविला जातो. ‘स्टॉप व्हायोलन्स अगेन्स्ट विमेन इन इंडिया’, असा तो उपक्रम आहे. याचा अर्थ असा की महिलांविरुद्धचा हिंसाचार थांबवा. एकट्या राजस्थानात दरवर्षी महिलांवरील अत्याचाराच्या 28 हजारांपेक्षा जास्त केसेस पोलिसात नोंदिवल्या जातात. त्यामुळे हा जो प्रकल्प राबविला जातो, त्याअंतर्गत पीडित महिलांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत पुरविली जाते. अतिशय सूक्ष्म स्तरावर महिला अत्याचाराविरोधात मोहीम चालविली जाते, अत्याचार कसा घातक आहे, तो सगळ्यांच्याच कसा तोट्याचा आहे, याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्नही या प्रकल्पांतर्गत केला जातो. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांकडे पाहण्याचा पुरुषांचा जो दृष्टिकोन आहे, तो बदलण्यासाठी या प्रकल्पाचा फार मोठा फायदा झाल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकल्प राज्याराज्यांत राबविण्यात आले तर महिलांचे जीवन निश्चितपणे सुकर होण्यास मदत होईल. महिलांना सन्मान नाही देता आला तरी महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. राजस्थानात दिवसभरात महिलांवरील अत्याचाराच्या किमान 40 केसेसची नोंद पोलिसात होते. नोंद न होणारी प्रकरणे किती असतील याचा तर अंदाजच नाही. राजस्थानात 24 तासांत बलात्काराच्या दहा घटना घडतात, ज्यांची पोलिसात नोंद असते. हुंड्यासाठी प्राणघातक हल्ला झाल्याच्या तीन घटना 48 तासांत घडतात. ही आकडेवारी अतिशय भयावह आहे. हे असे का होते ? एक तर पैशांचा लोभ आणि दुसरे म्हणजे मुलीकडच्यांकडून न होणारा विरोध!
 
अनेकदा लग्न ठरल्यानंतर हुंड्याची मागणी केली जाते. न दिल्यास लग्न मोडण्याची धमकी दिली जाते. समाजात आणि नातेवाईकांमध्ये आपली बदनामी होईल या भीतीने अनेकदा मुलीकडचे लोक हुंडा देण्यास राजी होतात आणि मग एकामागोमाग होणार्‍या मागणीला कंटाळतात. मुलीच्या सासरच्यांकडून होणारी मागणी पूर्ण करता येत नसल्याने स्वाभाविकच मुलीचा छळ सुरू होतो आणि अनेकदा तिला प्राणास मुकावे लागते. त्यामुळे मुलीकडच्यांनी आधीच हुंड्यास नकार दिला तर पुढचा अनर्थ टळू शकतो. नातेवाईक आणि समाज काय म्हणजे याची पर्वा न करता एकेका मुलीने धाडस दाखविले आणि हुंडा मागणार्‍याशी लग्न करणार नाही असा निर्धार जाहीर केला तर मुलाकडच्यांचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत.
 
राजस्थान, बिहार, हरयाणा, पंजाब, उत्तरप्रदेश यासारख्या राज्यांंमध्ये आधीच मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे लग्नाच्या बाजारात मुलीच मिळत नसल्याने असंख्य मलांवर अविवाहित राहण्याची नामुष्की ओढवली आहे. असे असतानाही मुलाकडचे लोक हुंडा मागत असतील, अन्य कारणांवरून सुनांचा छळ करणार असतील तर त्यांच्या कुटुंबात मुलगी न देता त्यांना धडा शिकविता येईल. सासरच्यांकडून छळ होऊन मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यापेक्षा आणि मुलीचा जीव गमावण्यापेक्षा आधीच हुंडणा मागणार्‍या मुलास नकार देणे केव्हाही श्रेयस्कर! याआधी अशा प्रकरणात अनेक मुलींनी धाडस दाखविले आहे. दारुड्या नवरदेवाशी लग्नमंडपात लग्नास नकार देण्याचे धाडस दाखविणार्‍या मुलींचे अभिनंदन तर करायलाच हवे, अन्य मुलींनीही आपले आयुष्य उद्‌ध्वस्त करू पाहणार्‍या मुलांना वेळीच धडा शिकविण्यासाठी अशा धाडसी मुलींकडून प्रेरणा घेतली पाहिजे.
 
आपल्याकडे फक्त कुटुंबांमध्येच महिला आणि मुलींवर अत्याचार होतो असे नाही. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेड काढली जाते, त्यांच्याकडे बघून विक्षिप्त असे हावभाव केले जातात, मुलींना नाना प्रकारचा त्रास दिला जातो, विनयभंग केला जातो. अनेकदा तर सार्वजनिक ठिकाणी महिलांनी जाऊ की नये, असा विचार करावा लागतो. त्यामुळे समाजात जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा फक्त पीडित मुली वा महिलांनीच प्रतिकार केला पाहिजे असे नव्हे, तर ही दृश्य बघणार्‍या प्रत्येकाने असले घृणित कृत्य हाणून पाडले पाहिजे. तुम्हाला आणि मलाही आई आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, बहीण आहे, याचा विचार आपण करायला हवा. आज जो प्रसंग इतर मुलींवर गुदरला तो उद्या आपल्यापर्यंत येऊन पोहोचला तर? या तरचा विचार करून अशा घटनांचा समाजाने सामूहिक प्रतिकार केला तर असे प्रकार हळूहळू कमी होतील, यात शंका नाही. म्हणतात ना, दुर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांची निष्क्रियता जास्त घातक असते, तेच खरे!
 
आता काही प्रकरणात स्त्रियांचाही दोष असतो. नसतोच असे नाही. अनेकदा स्त्रियाही पुरुषांचा मानसिक छळ करतात. आधुनिक युगातल्या अनेक मुलींना घरात सासू-सासरे, दीर-नणंदा नको असतात. त्यांना फक्त नवरा हवा असतो आणि माहेरची माणसं आलेलीच त्यांना आवडतात. अनेक मुली लग्न होताच, भरल्या घरात विभाजन घडवून आणतात. अशीही अनेक उदाहरणं आपल्या समाजात आहेत. कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्याने अनेकदा काही कारण नसताना पुरुषांविरुद्ध तक्रारी दिल्या जातात. अनेक घरांमध्ये तर पुरुषांना सतत धमक्या दिल्या जातात. तुम्ही माझे ऐकले नाही तर मी माहेरी निघून जाईन, मी आत्महत्या करीन, मी अमुक करीन मी तमुक करीन. त्यामुळे जो संवेदनशीुल पुरुष असतो ना, तो कारण नसताना नमते घेतो. बायकांच्या ताटाखालचे मांजर बनून राहतो. जे पुरुष असे करत नाहीत, त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाल्याचीही अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत. अनेकदा सुनेकडून खोटी तक्रार दिली गेल्याने निष्पाप असलेल्या सासरच्या मंडळींना कारागृहाची हवा खावी लागल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.
 
आपल्या बाजूने असलेल्या कायद्याचा दुरुपयोग कसा करावा अन्‌ आपल्या मनाप्रमाणे घटनाक्रम कसा घडवून आणावा, याचे कौशल्य अनेक स्त्रियांमध्ये पाहायला मिळते. अशा प्रकरणांचा निकाल लागतो तेव्हा, विवाहितेने केलेली तक्रार ही खोटी होती हे सिद्ध होते आणि सासरचे लोक निर्दोष मुक्त होतात. पण, मधल्या काळात त्यांना समाजाच्या रोषाचा जो समना करावा लागला असतो, जो प्रचंड मनस्ताप होतो, कारागृहाची हवा खावी लागते, त्यामुळे जे मानसिक आणि शारीरिक नुकसान होते, ते कधीही अन्‌ कशानेही भरून निघत नाही. ही बाब लक्षात घेता विवाहितेची तक्रार खोटी निघाल्यास तिलाही तेवढीच कडक शिक्षा करण्याची तरतूद आपल्या कायद्यात असायला हवी. शिवाय, तिच्याकडून आणि तिला चिथावणी देणार्‍या तिच्या माहेरच्यांकडून सासरच्यांना नुकसानभरपाई देण्याची तरतूदही केली जायला हवी. असे झाले तरच, अशा गैरप्रकारांना आळा बसेल आणि कुटुंबव्यवस्था मजबूत राहण्यास मदत होईल.