विश्वास...

    दिनांक :17-May-2019
डॉ. कल्पना पांडे
9822952177
 
विश्वास...! या शब्दातच त्याचं महत्त्व दडलंय. विधात्याच्या श्वासासम तो विश्वास. ‘विश्वास’ हे नाव कदाचित विधात्याने दिलेला श्वास, त्यासारखं हे नाव. विश्वासच, विश्वासार्ह, विश्वास टाकण्यासम. हा एखाद्यावर टाकला की आपण विश्वस्त, अगदी खात्री, गॅरंटी, करेलच ही आशा करतोच. ठामपणा या शब्दांशी जवळची बांधिलकी. विश्वास करणे, खरे मानणे, प्रतीत करणे. आपण या विश्वासाचा विचार केला तर उत्तरे येतात. कोणी म्हणतं विश्वास हा आंधळेपणा असतो. काही पाहायचे, बघायचे नाही, चौकशी करायची नाही व ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे.
 
विश्वास ज्याची आशा करतो त्या गोष्टींवर विश्वास-भरोसा ठेवून विश्वास मजबूत करणे. विश्वास निर्माण करणे गरजेचे असते. हा पुल्लिंगी शब्द. किती पटकन जवळीक होते ना त्या शब्दाशी. पटकन टाकतो व पटकन बसतो व तो टाकावाही. दुसरा काय करतो, कारण हे आपल्या हातातच नसतो. कधी मनात शंका निर्माण होते. पण नाही, तो टाकावाच लागतो. कधी कोणी गैरफायदा घेतही असेल, पण मग अशा वेळी तो तोडतो, हा त्याचा प्रश्न का? असे म्हणून सोडावे व सोडावेच लागते. माणूस दुसरे काय करणार व तुटला तर दु:ख होतंच. पण, तरीही आपण विश्वास ठेवावा. 
 
 
 
या कलियुगात विश्वास हा शब्द खरेतर फायद्यासाठी जास्त वापरला जातो. थोडा प्रश्नच पडतो, पण एवढी मोठी सृष्टी चालली असती का? म्हणतात ना, ‘जग विश्वासावर चालते.’ चालू द्यावं व समोर जावं. विधात्याचा श्वास ना. मग परमेश्वरावर जेवढा आपला विश्वास असतो, तेव्हा प्रत्येक व्यक्ती ही देवाचा अंश आहे, मग त्यावर विश्वास ठेवावा.
 
खरेतर मी लिहिते आहे, पण ‘विश्वास’ या शब्दाची व्याप्ती स्वत: मी खूप अनुभवली आहे. ते शब्दाचं जबरदस्त सामर्थ्य आहे. केवळे सामर्थ्य वाटतं शब्दात. विश्वास ठेवतोच ना. डॉ.कडे ऑपरेशनकरिता पूर्ण शरीर हवाली करतो. तो त्या वेळी परमेश्वराचा अवतारच असतो. सोनाराकडेही तोच विश्वास व प्रत्येक वस्तू, व्यक्ती अनेक नात्यांचं कोंदण त्याला आहे. साडीला काठ असावे तसे शब्दांची तो किनारच होय. सगळे विश्व भव्यता, देखणेपणा, सौंदर्य, मध्यवर्ती कल्पना जशी साडीच्या पदरात असते. तद्वतच हा शब्दही या अनेकविध बाबींचा साक्षीदार होय. या शब्दाशिवाय काही चालत नाही. आयुष्यातून याला वजा करता येत नाही. जन्मापासून ते मरेपर्यंतचा आलेख या शब्दाभोवती आखलेला असतो आणि त्यातून सार्थ होते केवळ विश्वासाने. शब्दांवाचून कळते सारे शब्दांच्या पलीकडले. पाहा, माझा विश्वास ठाम.