बोलिव्हिया

    दिनांक :17-May-2019
 फिरंगी तडका
वैदेही राजे-जोशी 
ठाणे
 
नमस्कार मंडळी! ‘फिरंगी तडका’च्या नव्या भागात तुमचं परत एकदा स्वागत आहे. मंडळी, मागच्या भागात आपण ‘बोलिव्हिया’ या दक्षिण अमेरिकन देशाच्या खाद्यसंस्कृतीबद्दल जाणून घेत होतो. आपण बघितले की या देशातील लोक सकाळच्या नाश्त्याला फारसे महत्त्व देत नाहीत. पट्‌कन होईल असा शॉर्टकट नाश्ता करून ते कामाला लागतात. इथल्या रेस्टॉरेंटमध्ये सकाळच्या नाश्त्याला कुठले पदार्थ असतात हे आपण बघितले. आजही आपण बोलिव्हियन पदार्थांची अधिक माहिती घेणार आहोत.
 
बोलिव्हियन लोक सकाळच्या वेळी ‘ऍपी’ नावाचे पेय पितात. हे एक पारंपरिक बोलिव्हियन पेय आहे. हे पेय मका (बर्‍याच वेळा पर्पल कॉर्न), अननस, पाणी, दालचिनी आणि साखर या जिन्नसांपासून बनवतात आणि सकाळी सकाळी चहासारखे गरमागरम असतानाच पितात. हे पेय बोलिव्हियामध्ये सगळीकडेच मिळते. इथले लोक बुन्यूएलोज बरोबर या पेयाचा आनंद घेतात. तसेच बर्‍याच वेळा ‘पॅन कॉन क्वेसो’ हा पारंपरिक बोलिव्हियन पदार्थ सुद्धा ऍपी बरोबर खातात. पॅन कॉन क्वेसो म्हणजे ‘ब्रेड विथ चीझ!’ इथला स्थानिक ब्रेड आणि चीझ स्लाइस हा इथल्या लोकांचा आवडीचा आणि परवडणारा तसेच पट्‌कन तयार होणारा व पटापट खाऊन संपवता येणारा नाश्ता आहे. 

 
 
 
बोलिव्हियन लोकांसाठी दिवसातले सगळ्यात महत्त्वाचे जेवण हे त्यांचे दुपारचे जेवण असते. बोलिव्हियामध्ये दुपारच्या जेवणाला ‘ऍलमुएरझो’ असे म्हणतात. त्यांचे रोजचे आयुष्य या दुपारच्या जेवणाभोवती फिरते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भरपूर पदार्थ असलेले मोठ्ठे भरपेट जेवण हे बोलिव्हियाचे वैशिष्ट्य आहे. या जेवणासाठी लोक काम सुद्धा दुपारी 12 ते 3 बंद ठेवतात. दुकाने सुद्धा या वेळात बंद असतात. (पुण्याची आठवण झाली ना?) लोक 12 ते 3 या वेळात घरी जाऊन आरामात शांतपणे कुटुंबाबरोबर त्यांच्या पारंपरिक भरपेट जेवणाचा आस्वाद घेतात, थोडावेळ वामकुक्षी म्हणजेच सीएस्टा घेतात आणि मग कामासाठी परत येतात. रविवारचे दुपारचे जेवण तर आणखी खास असते.
 
या दुपारच्या जेवणात अनेक कोर्स असतात. जेवणाची सुरुवात सुपने होते. नंतर मेन कोर्समध्ये मांसाचा पदार्थ असतो त्याबरोबर भाताचा प्रकार आणि बटाट्याचा एखादा पदार्थ असतो. त्यानंतर डेझर्ट म्हणून गोड पदार्थ आणि त्यानंतर हे लोक कॉफी घेतात. सोपा दे मनी म्हणजेच पीनट सूप हे इथले पारंपरिक सूप आहे. या सूपमध्ये पास्ता, बटाटे, मांसाचा तुकडा आणि भाज्या घातलेल्या असतात. याचप्रमाणे चायरो हे सूप सुद्धा इथल्या लोकांच्या आवडीचे आहे. हे सूप ला पाझ मधील लोकांच्या विशेष आवडीचे आहे. हे एक पारंपरिक सूप असून यात चुन्यो म्हणजेच डीप फ्रोझन पोटॅटो, मोतो म्हणजे पांढरा मका, चारके (जर्क्ड मीट) चव येण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ हे सगळे वापरून चायरो हे सूप केले जाते.
 
सूपनंतर मेन कोर्समध्ये मांसाचा पदार्थ असणे हे इथे अनिवार्य आहे. मटण किंवा चिकन वापरून हे पदार्थ बनवले जातात आणि त्याबरोबर भात आणि सॅलड खाल्ले जाते. ज्यांना भात नको असतो ते लोक मांसाच्या पदार्थाबरोबर पास्ता खातात किंवा बटाट्याचा पदार्थ खातात. पदार्थाची चव वाढवण्यासाठी बोलिव्हियन लोक याग्वा हा सॉस बर्‍याच पदार्थांवर घालून खातात किंवा पदार्थ करतानाच त्यात घालतात. हा सॉस बराच मसालेदार आणि तिखट असतो. टोमॅटो, लाल मिरची आणि काही हर्ब्स घालून हा सॉस तयार करतात. इथले लोक काळीमिरी किंवा पांढरी मिरपूड फारशी खात नाहीत.
 
बोलिव्हियन लोकांच्या आवडीचे काही पदार्थ म्हणजे पापास रेल्येनास, पीके अ लो माचो, क्विनोआ, मोंदोंगो, पिकांते दे पॉल्यो, प्लातो पसेन्यो, सॅन्डविच दे चोला, सीलपांचो, मसाको दे प्लांटेनो हे आहेत. पापास रेल्येनास हा पदार्थ खरं तर पेरूचा आहे पण बोलिव्हियन लोकांनी त्यात त्यांच्या चवीप्रमाणे थोडा बदल केला आहे. पापास रेल्येनास म्हणजे स्टफ्ड पोटँटोज होय. बटाटे उकडून मॅश करून त्यात उकडलेली अंडी किंवा चीझचे सारण भरून नंतर ते मैद्यात बुडवून तळतात. पिके अ लो माचो हा बीफचा पदार्थ आहे. यात बीफ, सॉसेज, कांदे, मिरच्या, अंडी आणि फ्रेंच फ्राईजचे तुकडे असतात आणि ह्यावर चवीसाठी मस्टर्ड, मेयोनीज आणि केचप घालून सर्व्ह करतात. हा पदार्थ एका वेळेला एकटा माणूस खाऊ शकत नाही. जर त्याने हा पदार्थ एकाच वेळेला खाऊन दाखवला तर इथले लोक त्याला माचो ही पदवी देऊन टाकतात.
 
क्विनोआ इथे घराघरांत खाल्ले जाते. ह्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने वेगवेगळ्या सुप्स, सलाड, स्ट्यू आणि बर्गरमध्ये याचा वापर केला जातो. इथले लोक डेझर्ट्स म्हणून कोकोनट पुडिंग, कोकोनट कुकीज, मँगो मूस, कोकोनट फ्लॅन, जेलो, राईस पुडिंग, बेक्ड मराईन्स, सिनॅमन सॉर्बे, चीजकेक आणि इथले खास असलेले बोलिव्हियन चॉकलेट खातात. इथले चॉकलेट जगात सुद्धा प्रसिद्ध आहे. ईशान्य बोलिव्हिया प्रदेशात उत्तम प्रतीचा कोकोचे उत्पादन होते. त्यापासून अतिशय सुंदर चवीचे चॉकलेट येथे तयार होते. तर अशी ही बोलिव्हियन खाद्यसंस्कृती आहे. दक्षिण अमेरिका खंडातील मोठ्या देशांबद्दल तर आपण जाणून घेतले. पण या खंडात अनेक लहान देश देखील आहेत. तिथल्या सुद्धा वैशिष्ट्‌यपूर्ण खाद्यसंस्कृतीबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊया. भेटू पुढील भागात... तोवर खाते रहो और खिलाते रहो.
 
 
मँगो मूस
साहित्य- २ मध्यम आकाराचे आंबे चिरून घेणे, १/२ कप लो फॅट क्रीम किंवा व्हिपिंग क्रीम, चवीपुरती साखर, गार्निश करण्यासाठी आंब्याचे काप किंवा किसलेले चॉकलेट किंवा सुक्यामेव्याचे तुकडे
 
कृती- ब्लेंडरमध्ये आंब्याच्या फोडी फिरवून घ्या. आंब्याचा घट्टसर रस तयार होईल. आंबा गोड असेल तर साखर घालण्याची गरज नाही. पण तुम्हाला जास्त गोड चव आवडत असेल तर आंब्याच्या फोडी बारीक करतानाच त्यात तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालून ब्लेंडरमधून फिरवून घ्या. चिल्ड व्हिपिंग क्रीम एका काचेच्या बाऊलमध्ये घ्या. काचेचा बाऊल सुद्धा क्रीम बीट करण्याआधी चिल्ड करून घ्या. व्हिपिंग क्रीम हाताने किंवा इलेक्ट्रिक बिटरवर सॉफ्ट आणि फ्लफी होईपर्यंत बीट करून घ्या. त्यात आंब्याचा रस घालून मिश्रण हलक्या हाताने एकजीव करून घ्या.
 
लहान आकाराच्या काचेच्या ग्लासमध्ये हे मँगो मूस घाला आणि त्या ग्लासेसना फॉईलने झाकून घ्या आणि फ्रिजमध्ये २० ते ३० मिनिट थंड रून घ्या. मँगो मूस खाताना त्यावर आंब्याच्या लहान फोडी किंवा आवडत असेल तर चॉकलेट किसून घ्या किंवा सुक्या मेव्याचे तुकडे घालून आणि आंब्याच्या सिझनला गारेगार मँगो मूसचा आनंद घ्या.