पाण्यात पाय सोडून खेळत होता अन्...

    दिनांक :17-May-2019
मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीपात्रात पाण्यात पाय सोडून बसलेल्या एका बारा वर्षांच्या मुलाला मगरीने ओढून नेले. या मुलाचा शोध सुरू असून, तो अद्याप सापडलेला नाही.
 
 
आकाश मारुती जाधव (१२, मूळ गाव निंबळक, जि. विजयपुरा) असे त्या मुलाचे नाव आहे. तो वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर कुटुंबातील आहे. डिग्रज-ब्रह्मनाळ रस्त्यावर छोटा पाणवठा आहे. तेथे जवळच वीटभट्टी असून, तेथील कामगारांची मुले पाणवठ्यावर जातात. गुरुवारी आकाश आणि त्याच्या दोन बहिणी पाणवठ्यावर गेले होते. आकाश नदीच्या पाण्यात पाय सोडून खेळत होता. अचानक मगरीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला खोल नदीपात्रात ओढून नेले. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
बराच वेळ मगर आकाशला जबड्यात धरून नदीपात्रात फिरत होती. ते दृश्य पाहून बघ्यांच्या अंगावर काटा आला. वन कर्मचाऱ्यांनी नौकेतून मगरीचा पाठलाग केला. काही वेळ पाठलाग केल्यानंतर मगरीने आकाशला सोडले. मगरीने आकाशला सोडल्याचे पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याचा नदीपात्रात शोध घेतला मात्र तो सापडला नाही.