'नाना पाटेकर यांना क्लीन चिट ही अफवा'

    दिनांक :17-May-2019
लैंगिक छळ केल्याच्या कथित प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाल्याच्या बातम्या खोट्या असल्याच्या खुलासा अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. मुंबई पोलिसांनी क्लीन चिट संदर्भात कोणतीच माहिती दिली नसून या प्रकरणात अद्याप तपास सुरू असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
‘या सर्व खोट्या बातम्या पसरवण्यासाठी नानांची पीआर टीम जबाबदार आहे. आरोपांनंतर त्यांना इंडस्ट्रीत कोणते काम मिळत नसल्यामुळे हे प्रकरण सावरण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला आहे. अशा अफवांवर कोणीच विश्वास ठेवू नका अशी मी सगळ्यांना विनंती करते,’ असं तिने म्हटलंय.
 

 
‘साक्षीदारांना धमकावले जात असल्या कारणाने त्यांना जबाब नोंदवण्यासाठी तयार करताना खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे जे खरे साक्षीदार आहेत ज्यांना सत्य माहित आहे त्यांना घाबरवले जात असून खोटे बोलणाऱ्यांना उभे केले जात आहे. अशा परिस्थितीत न्याय कसा मिळू शकेल?,’ असा सवालही तनुश्रीने उपस्थित केला आहे.
‘कितीही वेळ लागला तरी मी हार मानणार नाही. नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सावंत यांना शिक्षा व्हावी यासाठी मी अखेरपर्यंत प्रयत्न करणार. जर मी चार जणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे तर पोलीस त्यापैकी एकाच व्यक्तीला कसे क्लीन चिट देऊ शकतात? नानांच्या टीमकडून या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत,’ असंही ती म्हणाली.