नराधम बापाचा पोटच्या मुलीवर बलात्कार

    दिनांक :17-May-2019
 
 
नागपूर: पिता आणि पुत्रीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार नागपुरात समोर आला आहे. जन्मदात्या पित्याने पोटच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना पाचपावली हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करीत नराधम पित्याला अटक केली आहे. पीडित मुलीला आईवडिल आणि लहान भाऊ आहे. मुलगी ही आठव्या वर्गात शिकते. मुलीचे वडील सोनपापडीच्या कारखान्यात कामाला आहे. तर आई किराना दुकानात कामाला जाते. दुपारच्या वेळी मुलीचा बाप जेवण करण्यासाठी घरी येत होता त्यावेळी तो तिच्यावर बलात्कार करीत होता. मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. यापूर्वीच मुलीने ही माहिती आपल्या शिक्षिकेला दिली होती. शिक्षिकेने मुलीच्या आईला शाळेत बोलावून या घटनेची माहिती दिली होती. परंतु, आईने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे नराधम पित्याची हिंमत वाढली.
त्यानंतर १४ मे रोजी नराधम पित्याने तेच कृत्य केले. दुसऱ्या दिवशीही त्याने तेच कृत्य केले. त्यामुळे घाबरलेली मुलगी घराबाहेर पडली. शेजाऱ्यांच्या मदतीने ती आईच्या दुकानात गेली. त्यामुळे मुलीला घेऊन तिच्या आईने थेट पाचपावली पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून नराधम पित्याला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून त्याची २० मे पर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे. एकंदरीतच घडल्या प्रकारामुळे मुली स्वतःच्या घरातही कितपत सुरक्षित आहेत ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.