लाचखोर महिला क्रीडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

    दिनांक :17-May-2019
नागपूर: एका संस्थाचालकाकडून ५ हजाराची लाच घेतल्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने एका महिला क्रिडा अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. त्रिवेणी नत्थुजी बांते (३९) रा. राहतेकरवाडी, असे या क्रिडा अधिकाऱ्याचे नाव असून त्या विभागीय क्रिडा अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.
 

 
 
तक्रारदार या परसोडी (ता. पारशिवनी) येथे राहतात. त्यांची महेंद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्था आहे. या संस्थेमार्फत युवक कल्याण योजना प्रशिक्षण राबविण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. सदर संस्थेचा प्रस्ताव बांते यांनी मंजूर केला होता. त्याचप्रमाणे निधी संस्थेच्या खात्यात जमा केला. या कामाच्या मोबदल्यात बांते यांनी तक्रारदाराला ५ हजाराची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली.
या तक्रारीवरून गुरूवारी मानकापूर येथील विभागीय क्रिडा अधिकारी कार्यालयाभोवती सापळा रचण्यात आला. बांते यांनी तक्रारदाराकडून ५ हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.