नववे विश्व मराठी साहित्य संमेलन यंदा कंबोडियामध्ये

    दिनांक :17-May-2019
 
 
पुणे: विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित यंदाचे नववे विश्व मराठी साहित्य संमेलन कंबोडियाच्या अंग्कोरवाट येथे 28 ऑगस्ट 2019 रोजी होणार आहे.
विश्व मराठी परिषद ही शिवसंघ प्रतिष्ठानच्या सहकार्याने हे मराठी साहित्य संमेलन आयोजित करीत असून यंदाचे हे नववे संमेलन आहे. याआधी अंदमान, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, मॉरिशस, भूतान, बाली आणि दुबई येथे विश्व मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. स्व. निनाद बेडेकर, विनय सहस्रबुद्धे, विजय कुवळेकर, डी. एस. कुलकर्णी, शाम जाजू, संजय आवटे, डॉ. तात्याराव लहाने, एअर मार्शल भूषण गोखले आदींनी या संमेलनाचे अध्यक्षपद यापूर्वी भूषवलेले आहे.
या वर्षीच्या संमेलनासाठी अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणांहून आमंत्रण आले असता अखेर कंबोडिया येथील अंग्कोरवाट या ठिकाणी हे संमेलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
 
 
 
कंबोडिया येथे हे संमेलन आयोजित करण्याचे मुख्य कारण म्हणजे कंबोडियातील अंग्कोरवाट हे मंदिर. अद्भूत, अचाट, अलौकिक असे शब्द फिके पडतील अशी अनेक मंदिरे शेकडो एकर जागेत 12 व्या आणि 13 व्या शतकात बांधलेली आहेत. त्यांची सुरुवात हिंदू राजा सूर्यवर्मनन याने केली. कोणतीही आधुनिक साधने नसताना मोठ-मोठ्या दगडांवर बारीक कोरीव काम करून एवढी प्रचंड मंदिरे कशी बांधली असतील, हे विचारांच्या पलीकडे आहे. शेकडो वर्षांपूर्वी सातासमुद्रापलीकडे हजारो किलोमीटर दूर भारतातून येऊन अशी महाकाय वास्तूशिल्पे निर्माण करणार्‍या कर्तृत्ववान पिढीचा अभिमानास्पद प्रवास बघताना अंग्कोरवाट दर्शन कधी संपते ते कळतही नाही. म्हणूनच जगातील हे सातवे आश्चर्य बघायला आयुष्यात एकदा तरी कंबोडियाला जायलाच हवे.
दरवर्षी या संमेलनाला एक सूत्र असल्याने या वर्षीच्या संमेलनासाठी ‘पुरातन स्थापत्य शास्त्र’ हे सूत्र निश्चित करण्यात आले असून या विषयाशी संबंधित असलेले विविध आयाम या संमेलनातून हाताळले जातील. या संमेलनातील परिसंवादांमध्ये मराठी माध्यमांतील नामवंतांप्रमाणेच कंबोडिया येथील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कलावंत व लेखक देखील सहभागी होत आहेत.
जागतिक समुदायाशी मराठी माणसांना जोडणे, जगभरातील मराठी माणसांचे संघटन करणे, मराठी माणसांचे अनुभवविश्व समृद्ध करणे, विविध क्षेत्रांतील अनुभव साहित्यात उमटवणे, जागतिक अर्थव्यवस्थेत मराठी माणूस महत्त्वाचा होणे, मराठी भाषा जागतिक दर्जाची व्हावी, मराठी साहित्य व लेखन हे कथा, कविता, कादंबर्‍या, ललितकथा अशा ललित लेखनापुरतीच मर्यादित न राखता इतरही क्षेत्रातील माहितीपूर्ण लिखाण, ज्ञान प्रगल्भ व्हावे आणि ते लिहिणार्‍यांना लेखकाचा दर्जा मिळावा, तसेच फक्त साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेले साहित्यच नाही तर ‘साहित्य’ ही संकल्पना अधिक व्यापक करीत ती समग्र भाषा व्यवहाराशी जोडली जावी यासाठी आम्ही विश्व मराठी परिषदेची स्थापना केली आहे.
कंबोडिया येथील या एकदिवसीय संमेलनाला येणार्‍यास कंबोडियातील अन्य पर्यटनस्थळे आणि तिथली संस्कृती जवळून अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याचे या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कॅप्टन निलेश गायकवाड यांनी म्हटले आहे.