शेअर बाजाराची जोरदार उसळी

    दिनांक :17-May-2019
 
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी होणार्‍या शेवटच्या टप्प्यानंतर लगेच प्रसिद्ध होणार्‍या जनमत चाचणीवर डोळा ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांनी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी बड्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीवर भर दिल्याने मुंबई शेअर बाजाराने 537 अंकांची मोठी कमाई केली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 11,400 चा स्तर पार केला.
सकाळची सुरुवात सुमारे 200 अंकांच्या कमाईने झाल्यानंतर शेअर बाजारात दुपारच्या सत्रापर्यंत चढ-उतार पाहायला मिळाला. या व्यवहारात निर्देशांकाने 38,001.13 असा उच्चांक आणि 37,407.15 असा नीचांकही अनुभवला होता. दिवसभराच्या उलाढालीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 537.29 अंकांच्या कमाईसह 37,930.77 या स्तरावर बंद झाला. आजच्या व्यवहारात हिरो मोटर्स, मारुती, कोटक बँक, एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, मिंहद्र अॅण्ड मिंहद्र, एचडीएफसी बँक, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोल इंडिया, स्टेट बँक आणि एशियन पेंट्‌स यासारख्या कंपन्यांनी प्रचंड कमाई केली. तिथेच दुसरीकडे यस बँक, वेदांता, इन्फोसिस, एचसीएल, सन फार्मा, टीसीएस आणि एनटीपीसी या कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 150.05 अंकांची कमाई केली. दिवसभराच्या उलाढालीनंतर निफ्टी 11,407.15 या स्तरावर बंद झाला.