दुष्परिणाम लिक्विड नायट्रोजनचे

    दिनांक :17-May-2019
लिक्विड नायट्रोजनयुक्त कॉकटेल प्यायल्याने दिल्लीतल्या एका माणसाच्या पोटाला भोक पडलं. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. पोटाचा भोक पडलेला भाग काढून टाकावा लागला. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे लिक्विड नायट्रोजनच्या धोक्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. ज्यूस, कॉकटेल अधिक आकर्षकरित्या सादर करण्यासाठी लिक्विड नायट्रोजनचा वापर केला जातो. आईस्क्रीम थंड करण्यासाठीही लिक्विड नायट्रोजन वापरला जातो. या पार्श्वभूमीवर लिक्विड नायट्रोजन म्हणजे काय? त्याचे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात? याविषयी... 
 
 
 
लिक्विड नायट्रोजन म्हणजे काय?
लिक्विड नायट्रोजन हे नायट्रोजन वायूचं थंड द्रवरूप आहे. द्रव रूपातला हा नायट्रोजन खूप थंड असतो. थंडपणामुळे उणे 195.8 अंश सेल्सियस तापमानाला त्यातून वाफा येऊ लागतात. लिक्विड नायट्रोजनचं बाष्पीभवन होत असताना संपर्कात आलेली कोणतीही वस्तू, कोणताही पदार्थ तो क्षणार्धात गोठवू शकतो.
 
कशासाठी वापरला जातो लिक्विड नायट्रोजन?
डेझर्ट, आईसक्रीम असे पदार्थ गोठवण्यासाठी, विशिष्ट प्रकारची कॉकटेल्स तयार करण्यासाठी, थंड चाट बनवण्यासाठी लिक्विड नायट्रोजनचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाची आकर्षकता वाढते. पदार्थ झटपट गोठवण्यासाठी लिक्विड नायट्रोजनचा वापर केला जातो. योग्य पद्धतीने आणि प्रमाणात वापर केल्यास नायट्रोजन वायूचं हे द्रवरूप सुरक्षित असतं. लिक्विड नायट्रोजनचा वापर केलेला कोणताही पदार्थ नायट्रोजनचं पूर्णपणे बाष्पीभवन झाल्यानंतरच खाल्ला पाहिजे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एखाद्या पेयात लिक्विड नायट्रोजनचा वापर करण्यात आला असेल आणि या पेयात बुडबुडे येत असतील तर त्यात लिक्विड नायट्रोजन आहे, असं समजायला हवं. त्यामुळे बुडबुडे थांबल्यावरच पेयं प्यायला हवं. पेयावर पांढरा धूर किंवा बाष्प असेल तर ते पिण्यास हरकत नाही. नायट्रोजन वायूचं पूर्णपणे बाष्पीभवन झाल्यानंतर आणि पेय थंड झाल्यानंतर निर्माण होणार्‍या ओलाव्यामुळे असा धूर दिसतो. 
 
 
 
लिक्विड नायट्रोजनचं सेवन केल्यास काय होतं?
लिक्विड नायट्रोजन हे नायट्रोजन वायूचं रंगहीन द्रवरूप असलं आणि त्याचा वापर पदार्थ गोठवण्यासाठी केला जात असला तरी त्याची गणना खाद्यपदार्थ म्हणून करता येत नाही. नायट्रोजनचं हे द्रवरूप प्रचंड थंड असतं. याच्या थंडपणामुळे हिमबाधा होण्याची शक्यता असते. तसंच हे द्रवरूप शरीरात गेलंं तर अन्ननलिका आणि पोट यांच्या टिश्यूंना धोका पोहोचण्याची शक्यता वाढते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 20 अंश सेल्सियस तापमानात याची प्रसरण पावण्याची क्षमता 1 : 694 इतकी असते.
 
म्हणजे एक लीटर लिक्विड नायट्रोजनचं रूपांतर 20 अंश सेल्सियस तापमानाला 694 लीटरमध्ये होतं. चमचाभर लिक्विड नायट्रोजन घेतला तर 20 अंश सेल्सियस तापमानाला प्रसरण पावल्याने त्याचं प्रमाण 600 चमचे इतकं होतं. शरीरात गेल्यानंतर लिक्विड नायट्रोजनचे बाहेर पडण्याचे मार्ग बंद होतात. त्यामुळे पोटाला भगदाड पडू शकतं. परिणामी, लिक्विड नायट्रोजनयुक्त पदार्थ किंवा पेयांचं सेवन करताना विशेष काळजी घ्यायला हवी.