व्हॉट्स ॲपवरून तिहेरी तलाक!

    दिनांक :17-May-2019
पती, सासू-सासर्‍यांविरोधात गुन्हा
 
ठाणे: व्हॉट्स ॲपवरून तिहेरी तलाकचा संदेश पाठवून पत्नीला घटस्फोट देणार्‍या एका 28 वर्षीय इसमाच्या आणि त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात ठाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हे सर्व आरोपी मूळचे कल्याण येथील रहिवासी आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये मुस्लिमांमधील तिहेरी तलाक ही प्रथा निरर्थक, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले होते. या प्रकरणी एका 25 वर्षीय महिलेने भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये मागील आठवड्यात तक्रार नोंदवली होती. तिचा 18 मे 2014 रोजी आरोपीसोबत विवाह झाला होता आणि त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. ही महिला सध्या भिवंडीत तिच्या नातेवाईकांच्या घरी राहत आहे.
 

 
 
महिलेच्या तक्रारीनुसार, सासू-सासरे सातत्याने तिला छळत होते. काही दिवसांपूर्वी नवर्‍याने तिला पाच लाख रुपयांची मागणी केली आणि घराबाहेर काढले. यावर्षी 12 मार्च रोजी नवर्‍याने ‘तलाक, तलाक, तलाक’, असा संदेश पाठवला. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्याने नकार दिला.
संबंधित महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तिचा नवरा आणि सासू-सासर्‍यांविरोधात भादंविच्या विविध कलमांतर्गत आणि मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. फरार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काय आहे तिहेरी तलाक?
एकाच वेळी तीन वेळा ‘तलाक’ बोलण्याच्या प्रथेला ‘तलाक-ए-बिद्दत’ म्हणतात. इस्लामी विद्वानांच्या मते, कुराणात अशा प्रकारची तलाक व्यवस्था नाही. मूळ व्यवस्थेत तलाक बोलण्यासाठी एका महिन्याचे अंतर असते. या काळात पती-पत्नीमध्ये समेट होऊ शकतो. अनेक इस्लामी देशात तिहेरी तलाकला मान्यता नाही. पण, भारतात आजही ही प्रथा कायम आहे. देशातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी 70 टक्के सुन्नी पंथातील उलेमा याला मान्यता देतात.