ब्रेग्झिट; ब्रिटनमध्ये राजकीय तोडग्याचे प्रयत्न विफल

    दिनांक :18-May-2019
लंडन,
 
ब्रेग्झिट पेचात सहमती निर्माण करण्यासाठी सत्तारूढ हुजूर पक्षाच्यावतीने पंतप्रधान थेरेसा मे आणि विरोधी मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्यातील बैठक अपयशी ठरली असून कोणताही तोडगा निघालेला नाही.
 

 
२९ मार्चला ब्रेग्झिट अंमलात येणार होते. मात्र ब्रिटनच्या पार्लमेंट सदस्यांनी बहुमताने मे यांनी केलेल्या कराराचा मसुदा तीनदा फेटाळल्यानंतर मे यांनी युरोपीय समुदायाशी चर्चा केली. त्यानंतर मे यांना ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत वाढवून मिळाली आहे.
ब्रिटनमधील सत्तारूढ आणि विरोधी पक्षातले ब्रेग्झिट नेमके कसे अंमलात आणायचे याच्या कराराबाबतचे मतभेद मिटवण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून मे आणि कॉर्बिन यांच्या बैठकीकडे पाहिले जात होते. उभय नेत्यांमधील या चर्चाबैठका तीन एप्रिलपासून सुरू झाल्या होत्या. मात्र १६ मे रोजी मे यांनी जूननंतर आपले पंतप्रधानपद सोडण्याचे संकेत दिल्यानंतर उभय नेत्यांतील चर्चाही अधांतरी झाल्याची मजूर पक्षाची भावना झाली. त्यामुळे कॉर्बिन यांनी १७ मे रोजी पत्र लिहून आपली बोलणी संपुष्टात आल्याचे पंतप्रधानांनी जाहीर करावे, अशी मागणी केली. हुजूर पक्षात पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याने या चर्चेचे गांभिर्य टिकणे कठीण असल्याची भावना कॉर्बिन यांनी व्यक्त केली आहे.
आपण शक्य तितकी चर्चा केली आहे, त्यात ज्या मुद्दय़ांवर सहमती झाली तेसुद्धा आता अंमलात येतील, याची शाश्वती उरलेली नाही, असे कॉर्बिन यांनी म्हटले आहे. मे यांनी मात्र कॉर्बिन यांना प्रत्युत्तर देताना मजूर पक्षालाच दूषणे दिली आहेत. दुसऱ्यांदा सार्वमत घेण्यासारख्या प्रश्नांवर मजूर पक्षातच किमान एकवाक्यता नाही, असे त्यांनी म्हटले आहे.