टंचाईग्रस्तांसाठी डॉ दत्ता भराड बनले 'जलदूत'

    दिनांक :18-May-2019
शेतातील विहिरीतून दररोज जवळपास ४ लाख ८० हजार लिटर पाणी देतात मोफत
 
 चिखली: पाणीटंचाई हा आजच्या काळातला परवलीचा शब्द झाला आहे. तिसरे महायुद्ध झालेच तर त्याचे मूळ हे पाणी असेल. गोड्या पाण्याची वाढती कमतरता आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे खाऱ्या पाण्याची म्हणजे समुद्राची वाढती पातळी हे जागतिक पातळीवर एक मोठे प्रश्नचिन्ह बनू पाहत आहे. पाण्याच्या वाढत्या समस्येमुळे आपले अस्तित्व ऐरणीला लागले आहे. आपल्या देशात पाण्याच्या समस्येने इतके विक्राळ स्वरूप धारण केले आहे की वेळेवर या समस्येचे निवारण केले गेले नाही तर आपल्याला सगळ्यांना फार मोठी किंमत मोजावी लागेल. पाणी प्रश्न हा एक किंवा दोन राज्यांपुरता मर्यादित नसून तो भारतातल्या गावागावात तसेच शहरात मोठ्या चर्चेचा विषय आहे. दरवर्षी देशातील अनेक भागात कोरडा दुष्काळ पडत आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न करीतच आहे पण पाण्याचे संकट इतके व्यापक प्रमाणात आहे की त्यासाठीच्या उपाययोजना कमी पडत आहेत. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये लोक भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत. अनेक गाव-पाड्यांमध्ये आठ-आठ दिवस हंडाभर पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एक कुटुंब जलदूत बनून दररोज हजारो रहिवाशांची तहान भागवत आहे
 
 
चिखली येथील प्रसिद्ध कास्तकार व वैद्यकीय सेवा देणारे डॉ .दत्ता गणपत भराड यांनी चिखली तालुक्यातील धोडप, पळसखेड सपकाळ, श्रीकृष्ण नगर ,हातनी, सातगाव भुसारी, सोनेवाडी, सैलानी नगर खैरव, सवना,आंधई व गोकुळ नगर, भोगावती व तांबुळवाडी या गावांना मोफत पाणी देत आहे दररोज जवळपास २०टँकरच्या खेपा त्यांच्या शेतात असलेल्या एका विहिरीतून विनामूल्य भरून देत आहे जवळपास ४ लाख ८० हजार लिटरचा दररोज त्यांच्या विहिरीतून पाण्याचा उपसा होत आहे सहा एकर शेती असलेल्या डॉ. भराड यांच्या शेतात दोन विहिरी असून जवळपास २४ फुटाच्या या विहिरीत सद्य स्थितीतही भरपूर पाणी आहे विशेष म्हणजे २००५-२००६ मध्ये बुलढाणा येथे भीषण टंचाई असताना चार महिने पर्यंत दररोज ८५ च्या जवळपास टँकर विनामूल्य भरून देत होते. त्यांचे कार्य खरोखर खूप कौतुकास्पद आहे.
 
डॉ दत्ता भराड यांच्या प्रयत्नांना त्यांची धर्मपत्नी लिलाबाई यांची मोलाची साथ आहे. डॉ. दत्ताभराड यांनी त भा प्रतिनिधीला सांगितले की, समाजातल्या प्रत्येक वर्गाने सुसूत्रता राखून प्रत्येकाला मदत केली पाहिजे. आपल्या देशात अनेक समस्या मूळ धरून आहेत पण आपण स्वतः एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत नाही तोपर्यंत सरकारी प्रयत्नपण विफल ठरतील. आता वेळ आली आहे, आपण सगळे मिळून देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ बनण्याची. समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा हा माझा छोटा प्रयत्न असल्याचे सुध्दा ते म्हणाले . चिखली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी डॉ भराड ह्यांनी ऐन पाणी टंचाई च्या काळात मोफत पाणी देऊन देऊन समाजा पुढे एक आदर्श ठेवला असल्याचे त भा प्रतिनिधीला सांगितले. खरोखरच डॉ भराड सारख्या व्यक्तिंचा आदर्श घेऊन समाजातील नागरिकांनी आज पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे .