डॉ. तुषार देशमुख अमरावती विद्यापीठाचे नवे कुलसचिव

    दिनांक :18-May-2019
डॉ. रघुवंशी व डॉ. मोहरील अधिष्ठाता
 
अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिव पदी डॉ. तुषार देशमुख यांची निवड झाली असून रिक्त असलेल्या दोन अधिष्ठाता पदावर डॉ. एफ.सी.रघुवंशी व डॉ. अविनाश मोहरील यांची वर्णी लागली आहे. शुक्रवार सांयकाळी या नावांची घोषणा झाली.
 
 
 
 
अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी विद्यापीठ प्रशासनाने नियुक्ती प्रक्रिया राबविली होती. या सोबतच विज्ञान व तंत्रज्ञान तसेच मानव्य विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता पदासाठी नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार गुरुवारी कुलसचिव तर आज शुक्रवारी अधिष्ठाता पदासाठी मुलाखती घेण्यात आल्यात. कुलसचिव पदासाठी डॉ. तुषार देशमुख यांच्यासह डी.एस. राऊत, जयंत वडते, प्रीति घाटे, अनिल हिरेकन, संजय खड्डकार, यशवंत पोहेकर, प्रभाकर रामटेके, प्रशांत गावंडे, प्रफुल्ल उबाळे, विठ्ठल अदापुरे, राजूसिंग चव्हाण, लीना चितलांगे यांनी मुलाखती दिल्या होत्या. कुलसचिव पदासाठी डॉ. तुषार देशमुख यांची निवड करण्यात आली. याशिवाय विद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी डॉ. एफ.सी.रघुवंशी व मानव्य विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता पदासाठी डॉ. अविनाश मोहरील यांची निवड करण्यात आली. निवड समितीमध्ये नागपुर विद्यापीठाचे एस. काने, रामटेक विद्यापीठाचे श्रीनिवास वरखेडी, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशीकला वंजारी यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.दिनेश सूर्यवंशी व प्रा. प्रदीप खेडकर यांचा समावेश होता.