पुण्यात रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे ठेऊन घातपाताचा प्रयत्न

    दिनांक :18-May-2019
पुणे: पुण्यात रेल्वे रुळांवर घातपात घडविण्याच्या प्रयत्नांसाठी जाणीवपूर्वक लोखंडी तुकडे ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारचा खुलासा खुद्द रेल्वे प्रशासनाने केला असून हजारो प्रवाश्यांची सुरक्षा यामुळे धोक्यात आली आहे. पुणे रेल्वे मार्गावर गेल्या तीन ते चार महिन्यात तब्बल आठ ते दहा वेळा रुळावर लोखंडी तुकडे ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच कामशेत येथे हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेसलादेखील टार्गेट करण्यात आले होते. हजारो लोक दररोज या मार्गावर रेल्वेने प्रवास करतात. अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कुठलीही संशयास्पद व्यक्ती असा प्रकार करतांना आढळ्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.