इराकमधील अनावश्यक कर्मचार्‍यांना अमेरिका परत पाठवणार

    दिनांक :18-May-2019
वॉशिंग्टन,
इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेचे मुख्य दूतावास आणि एरबिल येथील वाणिज्य दूतावास येथील अनावश्यक कर्मचार्‍यांना माघारी बोलावण्याचे आदेश अमेरिकेने दिले आहेत. अमेरिका आणि इराणदरम्यानचा तणाव सध्या वाढू लागला आहे. त्यामुळे इराणच्या शेजारील इराकमधील दूतावासांमध्ये केवळ आवश्यक तेवढेच कर्मचारी ठेवण्यात यावेत, असे आदेश अमेरिकेने दिले आहेत.
 
 
 
इराकमध्ये दहशतवादी संघटनांची सक्रियता आणि यापूर्वी दूतावासांवर झालेल्या हल्ल्यांची दखल घेऊन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराकमधील दूतावास अंशत: बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इराकमधील दहशतवादी संघटनांमध्ये अमेरिकेविरोधातील संघटनांचा समावेश आहे. या संघटनांमुळे इराकमधील अमेरिकेच्या नागरिकांना आणि पाश्चिमात्य कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच अमेरिकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेने इराणवर मोठा दबाव आणला आहे. संभाव्य कारवाईची गरज लक्षात घेऊन अमेरिकेने आखातामध्ये लढाऊ विमानवाहू नौकाही तैनात केल्या आहेत.