पत्रकार समाजमन जागृत करणारा असावा- जगदीश उपासनी

    दिनांक :18-May-2019
 
देवर्षी नारद जयंती पत्रकार सन्मान सोहळा
 
अमरावती: पत्रकाराने फक्त माहिती देण्या इतपत पत्रकारीता न करता समाजमन जागृत करणारी पत्रकारीता करावी, असे कळकळीचे आवाहन इंडिया टुडे हिंदीचे माजी संपादक, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारीता विद्यापीठ भोपाळचे माजी कुलगुरू जगदीश उपासनी यांनी केले.
 
 
 
विश्वसंवाद केंद्र, अमरावतीचे वतीने शुक्रवार 17 मे रोजी सांयकाळी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडीटोरियममध्ये देवर्षी नारद जयंती पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, विश्वसंवाद केंद्र विदर्भ प्रातांचे प्रमुख सुधीर पाठक, रा.स्व.संघाचे प्रांत प्रचार व प्रसार प्रमुख अनिल सांबरे, जनमाध्यमचे संपादक प्रदीप देशपांडे उपस्थित होते. उपासनी पुढे म्हणाले, पत्रकारीतेचे स्वरूप बदलले असून पुर्वी आपण ज्याला प्रेस म्हणायचो आता तो मिडीया झाला आहे. मोठमोठे मिडीया हाऊस स्थापन झाले आहे. मुद्रीत, दूरचित्रवाणी, वेबपोर्टल अशा विविध माध्यमांचा त्यात समावेश असून अत्याधुनीक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचे संचालन होत आहे. आता मिडीया ही एक इंडस्ट्री झाली आहे आणि देशाच्या जीडीपीत त्याचे योगदान 0.38 टक्के आहे. सध्याच्या स्थितीत हा मिडीया समाजाची दिशा ठरवित आहे. पण, ते फारसे पोषक नसून समाजाचे मिडीयावर प्रभुत्व राहायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी पत्रकारांनी सजग राहून समाजाला शिक्षीत करणारी पत्रकारीता करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. चांदेकर यावेळी म्हणाले, नकारात्मक बातम्या द्यायच्याच किंवा दाखवायच्याच नाही, असे मी म्हणार नाही. पण, आज त्याचे जे स्वरूप आहे त्यात निश्चितपणे बदल अपेक्षित आहे. माध्यमांनी नकारात्मकतेला प्राधान्य दिल्यास समाज व्यवस्थाही बाधीत होते आणि देशाच्या प्रतिमेलाही धक्का बसतो. विश्वसंवाद केंद्राने अतिशय चांगला उपक्रम सुरू केला असून देवर्षी नारद यांचे महत्व व कार्य समाजापुढे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पुर्वी विश्वसंवाद केंद्र व त्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सुधीर पाठक यांनी दिली. प्रदीप देशपांडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची व सुरु करण्यात आलेल्या पुरस्काराची माहिती दिली. गेली अनेक वर्ष पत्रकारितेत योगदान देणार्‍या ज्येष्ठ पत्रकार भास्करराव कुळकर्णी व जुगलकिशोर राठी यांचा सत्कार विश्वसंवाद केंद्रातर्फे उपस्थित मान्यवरांनी शाल, श्रीफळ व मानचिन्ह देवून करण्यात आला. प्रकृती अस्वस्थेमुळे राठी यांचा सन्मान त्यांच्या पत्नी व मुलाने स्विकारला. भास्करराव कुळकर्णी यांनी आपल्या मनोगतातून तत्कालीन पत्रकारितेचे अनुभव कथन केले. यावेळी साप्ताहिक विवेक क्रांतीच्यावतीने काढण्यात आलेले नारद जयंती पुरवणीचे प्रकाशनही झाले. तसेच वृत्तपत्र कार्यालयात नारद प्रतिमा लावण्यासाठी विश्वसंवाद केंद्रातर्फे नारद प्रतिमेचे वितरणही यावेळी झाले. कार्यक्रमाचे संचालन प्राची पालकर व उपस्थितांचे आभार संजय गवळी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वसंवाद केंद्र, अमरावतीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.