अवैध रेती उत्खननाचा १६ वर्षीय तरुण बळी!

    दिनांक :18-May-2019
रेती घाटावर जेसीबीच्या धक्याने मृत्यू
पालोरा: लिलावात न निघालेल्या रेती घाटातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या रेतीचे उत्खनन करीत असताना जेसीबीचा धक्का लागून एका 16 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. नवनीत संजय सिंदपूरे असे युवकाचे नाव असून फिरायला जातो, असे आईला सांगून गेलेला हा तरुण पून्हा घरी परतलाच नाही.
रेतीच्या गोेरखधंद्यामुळे जिल्हयातील वातावरण प्रचंड खराब होत आहे. गुन्हेगारी वाढत असतानाच अनेकांचे नाहक बळी जात आहेत. रेती माफीयांच्या फायद्यासाठी निष्पाप लोकांचे जात असलेल्या जीवांची पर्वा प्रशासनालाही नाही. अनेक गावांमध्ये हा रेतीचा उद्योग कुटूंबांची वाताहत करणारा ठरला आहे. सुरुवातीच्या काळात रेती माफीयांकडून ग्रामस्थांना प्रलोभने दाखवून नंतर गुन्हे करण्यासाठी अशांनाच पूढे करुन स्वतः मात्र रेती माफीया नामानिराळे झालेले दिसतात.
 


 
अवैध रेतीच्या धंद्यांमुळे अनेक प्रकारचे नूकसान होत असतानाच लोकांचे जीवही चालले आहेत. रेतीच्या ट्रकने अपघात होऊन लोकांचा मृत्यू होत असताच 17 रोजी मुंढरी येथील वैनगंगा नदीच्या रेती घाटावर घडलेली घटनाही तेवढीच अंगावर शहारे आणणारी आहे. रोहा येथील नवनीत संजय सिंदपूरे हा 16 वर्षाचा तरुण चेतन उके याच्या सोबत फिरायला जातो म्हणून आईला सांगून निघून गेला. नवनीतच्या आईला काही वेळाने चेतन हा घरी दिसला. तिने त्याला नवनीत कुठे आहे, असे विचारले. त्यावर चेतनने तो नदीवर झोपला असल्याचे सांगितले. मात्र काही वेळाने चेतनने नवनीतचा जेसीबी ची बकेट लागून मृत्यू झाल्याचे सांगितले. ही वार्ता पसरताच लोकांनी नदी परिसरात गर्दी केली. मोहाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकांनी येऊन कारवाई करीत नवनीतचे प्रेत विच्छेदनासाठी पाठविले.
घाट लिलाव झालेला नसताना व रात्री रेती भरण्याची परवानगी नसतानाही अवैध रित्या रेती भरण्यासाठी आलेला जेसीबी कूणाचा हा प्रश्न गावकèयांनी उपस्थित केला असून रेती माफीयांचा फायदा आणि अधिकाऱ्यांच्या  स्वार्थामुळेच नवनीतचा बळी गेल्याची चर्चा आहे. जेसीबी मालकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गावकèयांनी केली आहे. पोलिसांनी कारवाई करुन आरोपीला आत टाकले तरी जोपर्यंत अवैधरित्या होणाऱ्या कामांवर निर्बंध लागत नाहीत, तोपर्यंत असेच बळी जात राहतील, यात शंका नाही.
जेसीबी, ट्रॅक्टर ताब्यात
घटनेनंतर रेतीघाटावरून जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन चालक फरार झाले होते. पोलिसांनी त्यांना शोधून जेसीबी व ट्रॅक्टर जप्त केले असून चालकांना ताब्यात घेतले आहे. सोबतच नवनीतचा मित्र चेतनलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.