४५ वर्षांच्या तुरुंगवासानंतर दोषमुक्त, मिळाले एक कोटींची नुकसान भरपाई

    दिनांक :18-May-2019
अमेरिकेतील मिशिगन येथे ४५ वर्षांच्या तुरुंगवासानंतर एका व्यक्तीला दोषमुक्त करण्यात आले आहे. रिचर्ड फिलीप (वय ७३) असे या व्यक्तीचे नाव आहे. निर्दोष असूनही इतका प्रदीर्घ काळ तुरुंगवास झालेले रिचर्ड हे अमेरिकेतील पहिलीच व्यक्ती असून त्यांना आता १.५ दशलक्ष डॉलरची (सुमारे एक कोटी रुपये) भरपाई मिळणार आहे.
 

 
 
 
 
रिचर्ड फिलीप हे १९७२ मध्ये हत्येच्या गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेले. या प्रकरणात ते दोषी ठरले. मात्र, २०१८ मध्ये त्यांना या प्रकरणात दोषमुक्त कऱण्यात आले होते. तब्बल ४५ वर्षांच्या तुरुंगवासानंतर ते तुरुंगातून बाहेर आले. मिशीगनमधील अ‍ॅटर्नी जनरल यांनी या प्रकरणात फिलीप यांना १. ५ दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मिशीगनमध्ये २०१६ मधील कायद्यानुसार एखाद्या निर्दोष व्यक्तीला तुरुंगवास झाल्यास त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. फिलीप यांच्यावर दोन खटले सुरु होते. यातील एक खटला हत्येचा तर दुसरा खटला चोरीचा होता. यातील हत्येच्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना दोषमुक्त करण्यात आले. तुरुंगातून सुटका झाल्यावर फिलीप यांनी तुरुंगात काढलेले चित्र विकले होते. यातून मिळालेल्या पैशांच्या आधारे त्यांचा उदरनिर्वाह सुरु होते. नुकसान भरपाई मिळाल्याने फिलीप यांना दिलासा मिळाला आहे.