तुमची जहाजे आम्ही सहज उडवू शकतो!

    दिनांक :18-May-2019
- इराणची अमेरिकेला धमकी
तेहरान,
आखाती देशातील तुमची जहाजे आम्ही सहज उडवू शकतो. आमच्या शक्तीला कमी लेखू नका, याची तुम्हाला मोठी िंकमत मोजावी लागेल, अशी धमकी इराणने अमेरिकेला दिली आहे. इराण-अमेरिकेच्या वाढत्या तणावामुळे युद्धाची भीती वर्तवण्यात येत आहे. इराणशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. मात्र, इराणची चर्चेची तयारी नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे, तर अमेरिकेने निर्बंध मागे घ्यावे, अशी इराणची मागणी आहे. अमेरिका आणि इराणचे संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. अमेरिकेचे निर्बंध आणि वाढत्या दबावाच्या पृष्ठभूमीवर, इराणने अमेरिकेला धमकी देत निर्बंध मागे घेण्याची मागणी केली आहे.
 
 
 
आमच्या कमी अंतरावरील क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आखाती देशातील अमेरिकेची लढाऊ जहाजे आहेत. ती उडवण्याची क्षमता आमच्यात आहे, अशा शब्दात इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे सहकमांडर मोहम्मद सालेह यांनी धमकावले आहे. आणखी एका युद्धाला तोंड देण्याची अमेरिकेची क्षमता नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्यावर निर्बंध लादून अमेरिका आखाती देशातील तणाव वाढवत आहे. स्वार्थासाठी इराणवर दबाव टाकण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही कोणत्याही दबावाखाली येणार नाही, असेही ते म्हणाले. दुसरीकडे, आमची ताकद कमी लेखण्याची चूक अमेरिकेने करू नये. ही चूक त्यांना महागात पडेल, असा इशारा इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल अब्दुल रहीम मौसवी यांनी दिला आहे.
  
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात इराणशी करण्यात आलेला अणुकरार डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने 2015 मध्ये रद्द केला. त्यानंतर इराणवर कठोर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाले. इराणकडून तेल आयात करणार्‍या देशांनाही आयात रोखण्याच्या सूचना अमेरिकेने केल्या. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला आहे. त्यातच अमेरिका इराणवरील दबाव आणखी वाढवत असल्याने इराणची कोंडी झाली आहे. त्यामुळे आखाती देशातील तुमची जहाजे आम्ही सहज उडवू शकतो, अशी धमकी आता, इराणने अमेरिकेला दिली आहे.
 
आखाती देशातील तणाव वाढत असून, हा तणाव युद्धापर्यंत वाढू नये, यासाठी दोन्ही देशांनी संयम बाळगावा, असे आवाहन इराकसह जागतिक स्तराहून करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी अणुकरार रद्द केल्याने चर्चेला तयार नसल्याचे इराणने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेचे निर्बंध, तेलआयातीवर घातलेली बंदी आणि वाढता जागतिक दबाब यामुळे इराण त्यांचे क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रम थांबवेल, अशी अपेक्षा ट्रम्प प्रशासनाने व्यक्त केली आहे.