हो मी समलैंगिक; धावपटू द्युती चंदचा गौप्यस्फोट

    दिनांक :19-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
ओडिशा,
मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. ती माझी मैत्रीण असून तिच्याशी माझे प्रेमसंबंध आहे. ओडिशातील आपल्या मूळ चाका गोपालपूरगावच्या या मुलीशी माझे समलैंगिक संबंध आहे, असा गौप्यस्फोट भारताची अव्वल वेगवान धावपटू द्युती चंदने केला आहे.
 
100 मी. शर्यतीतील राष्ट्रीय विक्रम द्युती चंदच्या नावावर असून द्युती चंद ही चाका गोपालपूर गावाची रहिवासी असून तिचे पालक जजपूर जिल्ह्यातील विणकर आहेत. आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये या दृष्टीने द्युतीने मैत्रिणीची ओळख सांगण्यास नकार दिला. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच सार्वजनिकरित्या समलैंगिक असल्याचा दावा केला आहे.
 
 
 
द्युतीने 2018च्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने देशाला रौप्यपदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिचे हे दुसरे पदक ठरले. द्युतीने 100 मीटर स्पर्धेत वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. सातव्या क्रमांकाच्या लेनमध्ये धावताना द्युतीने 11.32 सेकंदाची वेळ नोंदविली. 200 मीटर शर्यतीत द्युतीने 23.20 सेकंदांची वेळ नोंदविली. एकाच आशियाई स्पर्धेत 100 मी. व 200 मी. शर्यतीत पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरली. यापूर्वी लेव्ही पिंटो, आर. ज्ञानसेखरण, पी.टी.उषा यांनी हा विक्रम केला होता.
 
सध्या ती दोहा विश्व ॲथ्लेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची पूर्वतयारी करत असून 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देण्याचा तिचा निर्धार आहे.
मला माझा आत्मा, जीवनसाथी गवसला आहे. आपल्याला कोणासोबत आयुष्य घालवायचे आहे, याचे स्वातंत्र्य सर्वांना मिळायला हवे. समलैंगिक असलेल्यांना मी नेहमी पािंठबा दिला आहे आणि ही वैयक्तिक निवड आहे. गतवर्षीच सर्वोच्च न्यायलयानेसुद्धा 377 कलमाचा अपवाद वगळण्याचा ऐतिहासिक निर्णया दिल्यानंतर मला हे बोलण्याचे धाडस मिळाले आहे. तेव्हा एक खेळाडू म्हणून माझ्या कामगिरीवर शंका उपस्थित करण्याचा कोणालाही अधिकार नाही. समलैंगिक संबंध ठेवणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्याचा आदर करायला हवा. भारतासाठी मी पदक जिंकत राहीन, असेही ती म्हणाली.
 
2015 साली द्युती चंदने क्रीडा लवाद न्यायालयात आयएएएफच्या हायपर ॲण्ड्रोजेनिज्म संदर्भातील नियमाविरुद्धची कायदेशीर लढाई जिंकली होती. हे प्रकरण जिंकणारी ती पहिली महिला भारतीय खेेळाडू ठरली. एएआयएफच्या या नियमानुार ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत उच्च टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढलेल्या खेळाडूंवर प्रतिबंध घालण्यात येतो.
 
मला माझ्या स्वप्नातला जीवनसाथी मिळाला आहे. एक खेळाडू म्हणून मला प्रोत्साहन देणारा जोडीदार असावा अशी माझी इच्छा होती. मी गत 10 वर्षांपासून धावत असून आगामी 5-7 वर्षे धावणे कायम राखणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी जगभर फिरली आहे. हे सोपे नाही. मलासुद्धा कुणाचा तरी सहारा पाहिजे, असे द्युती चंद म्हणाली.