राज्यातील २६ धरणांतील पाणीसाठा शून्य पातळीवर

    दिनांक :19-May-2019
 मुंबई: मागील वर्षाच्या तुलनेत आजच्या घडीला राज्यातील सुमारे 26 धरणातील पाणीसाठा शून्य पातळीवर आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने याबाबतची माहिती दिली.
जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळानुसार, औरंगाबाद महसूल विभागातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील धरणांमध्ये 0.43 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी हाच साठा 23.44 टक्के इतका होता. याशिवाय पैठण, मांजरा, माजलगांव, यलदरी, सिद्धेश्वर, निम्न तेरणा, सिना कोळेगाव आणि निम्न दुधना या प्रकल्पातील पाणीसाठा शून्य पातळीवर असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. मागील वर्षात याच काळात पैठण प्रकल्पात 34.95 टक्के, मांजरा प्रकल्पात 21.24 टक्के, माजलगाव प्रकल्पात 17.5 टक्के तर, निम्न तेरणामध्ये 52.03 टक्के इतका पाणीसाठा होता.
 

 
 
याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि पेनटाकळी, नागपूर विभागातील गोसखूर्द, दिना आणि नांद, जळगाव जिल्ह्यातील अप्पर तापी, हातनूर, नाशिक विभागातील वाकी, भाम, भावली आणि पुनगांव, पुणे विभागातील डिभे, घोड, पिंपळगाव जोगे, वडज आणि टेमघर, तर सोलापूर जिल्ह्यातील भिमा, कुंडाळी टाटा आणि लोणावळा टाटा प्रकल्पातही पाण्याचा साठा शून्य पातळीवर आला आहे. तसेच, नाशिक जिल्ह्यातील तिसगांव आणि नागपूर विभागातील तोतलाडोह प्रकल्पात अनुक्रमे 0.01 टक्के आणि 0.08 टक्के पाणीसाठा असल्याचेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. राज्यात 103 मोठे आणि मध्यम तसेच लघु प्रकल्पात मागील वर्षीच्या 23.73 टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा केवळ 11.84 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाने नमूद केले आहे.