गानकोकिळेच्या पहिल्या परफॉर्मन्सला ८० वर्षे!

    दिनांक :19-May-2019
मुंबई,
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पहिल्या वहिल्या जाहीर कार्यक्रमाला ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. लता मंगेशकर यांनी पहिल्यांदा सादरीकरण केले, तेव्हा त्या केवळ ९ वर्षांच्या होत्या. मंगेशकर कुटुंबियांना हा क्षण साजरा करण्याची तयारी केली आहे.

 
 
पहिल्या जाहीर कार्यक्रमाला ८० वर्षे पूर्ण झाली, यावर विश्वास बसत नाही. काळ कसा पुढे सरकला हे, समजलंच नाही. तो कार्यक्रम अगदी गेल्या महिन्यात झाल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया लता मंगेशकर यांनी दिली. लता मंगेशकर यांनी आपले वडील दीनानाथ मंगेशकर यांच्याकडे वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीत साधनेला सुरुवात केली. वडिलांबरोबर सादरीकरण करण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्या संधीची वाट पाहात होत्या. अखेर १९३९ मध्ये लता मंगेशकर यांना ती संधी मिळाली.
कार्यक्रमांची अनेक निमंत्रणे वडिलांना येत असत. त्यावेळी जाहीर कार्यक्रमात गाण्याची इच्छा मी वडिलांना बोलून दाखवली. वडील हसले आणि म्हणाले की, जाहीरपणे गायन करायला अजून तू लहान आहेस. मात्र, आयोजकांना ही कल्पना आवडली आणि दोन पिढ्या एकत्र मंचावर सादरीकरण करताहेत, हे श्रोत्यांना फार आवडेल, असे आयोजकांनी वडिलांना सूचवले. वडिलांनी त्यांना होकार दिला, अशी आठवण लता मंगेशकर यांनी सांगितली.
मला अजूनही आठवतंय. भागवत चित्र मंदिराचे सभागृह पूर्ण भरले होते. आम्ही सुरुवातीला राग खंबावती सादर केला. त्यानंतर प्रसिद्ध नाट्यगीत सादर केलं. श्रोत्यांना दोघांचं गाण खूप आवडलं. त्यानंतर वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेले. कार्यक्रमानंतर मी खूप दमले होते, असेही मंगेशकर म्हणाल्या.