अमरावतीत पुनर्वसित वस्तीला आग; ७० झोपड्यांची राखरांगोळी

    दिनांक :19-May-2019
तीन सिलेंडरचे स्फोट
 
 
तभा ऑनलाईन टीम 
अमरावती,
येथून जवळच असलेल्या वलगाव येथील आठवडी बाजार परिसरात असलेल्या पुनर्वसितांच्या वस्तील्या जवळपास ७० झोपड्या आज सकाळी १०.३० वाजता दरम्यान लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाल्या. सदर आग सिलेंडरचा स्फोट झाल्याने लागल्याची माहिती मिळाली आहे.
 
वलगाव येथून वागणाऱ्या पेढी नदीच्या काठावर राहणाऱ्या ७० कुंटुबांचे पुनर्वसन आठवडी बाजारला लागून असलेल्या जागेत २०१३ मध्ये करण्यात आले होते. टिनाचे शेड टाकून येथे जवळपास ७० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान यातील एक झोपडीतील सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. उन्हाच्या तडाख्यात आगीने काही क्षणात विक्राळरूप धारण केले. सर्वत्र कल्लोळ सुरू झाला. त्यातच आणखी दोन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग आणखीनच भडकली. रहिवाशी झोपडीतले हातात मिळेल ते साहित्य सुरक्षित राहावे म्हणून बाहेर काढत होते. तर अनेक मंडळी आग विझविण्यासाठी प्रयत्न करत होते. याच काळात अमरावतीच्या अग्निशमन यंत्रणेला माहिती देण्यात आली.
 
अग्निशमनची गाडी घटनास्थळी जवळपास एक ते सव्वा तासाने पोहचली, तोपर्यंत सर्वच झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. आगीची धक मात्र अग्निशमनने शांत केली. या आगीत प्रवीण सिरसाठ यांची बैल जोडी जळून मृत्युमुखी पडली. सगळ्याच्याच घरचे गृहपयोगी साहित्य जळून खाक झाले. येथील सर्व कुटुंब उघड्यावर आले आहे. पंचनामा करण्यासाठी काही अधिकारी पोहचले होते. अगग्रस्तांना मदत पुरविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले होते.