पाकिस्तानच्या तटवर्ती भागात खनिज तेल, वायूचा साठा नाही

    दिनांक :19-May-2019
-पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वप्न भंगले
 
 
कराची, 
अरबी समुद्रातील कराचीच्या तटवर्ती भागात कोणतेही खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडले नसल्याचे वृत्त येथील प्रसारमाध्यमांनी रविवारी दिले आहे. या वृत्तामुळे पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वप्न भंगले आहे. आर्थिक गर्तेत अडकलेला पाकिस्तान खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांमुळे स्वयंपूर्ण बनेल, असे वक्तव्य त्यांनी या साठ्यांची पूर्ण माहिती येण्यापूर्वी केले होते.
 
खनिज तेल किंवा नैसर्गिक वायूचा कोणताही साठा न आढळल्याने कराचीजवळ खोल समुद्रात सुरू असलेले केक्रा-1 हे खननकर्म अखेर थांबवण्यात आले, अशी माहिती पंतप्रधान इम्रान खान यांचे पेट्रोलियम विभागाचे विशेष सहायक नदीम बाबर यांनी दिली. पाकिस्तानी जलसीमेत असलेल्या अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात खनिज तेल आणि वायुसाठे सापडण्याची अपेक्षा पाकिस्तानला होती. अमेरिकेतील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी एक्सॉन मोबिल, इटलीतील ईएनआयसह दोनेक कंपन्या समुद्रात तेलविहीर खोदण्याच्या कार्यात गुंतल्या होत्या.
 
कराचीच्या तटवर्ती भागात केक्रा-1 अंतर्गत 5,500 मीटरपेक्षा जास्त खोदकाम करण्यात आले, अशी माहिती बाबर यांनी दिल्याचे वृत्त जिओ न्यूजने दिले आहे. या भागात कोणतेही तेल िंकवा वायुसाठे आढळले नसल्याचा अहवाल डीजी पेट्रोलियमने दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. आता थांबवण्यात आलेल्या या प्रकल्पावर आतापर्यंत 10 कोटी डॉलर्सचा खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले.
 
खनिज तेल आणि नैसर्गिक वायुसाठे सापडल्यावर पाकिस्तानचे खनिज तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व संपुष्टात येईल, असे इम्रान खान यांनी मार्चमध्ये सांगितले होते. मागील चार महिन्यांपासून केक्रा-1 मध्ये इटलीची कंपनी ईएनआयने अमरेकी कंपनी एक्सॉन मोबिल आणि पाकिस्तानच्या सरकारी कंपन्या ऑईल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेसोबत खोदकाम करीत होती. या ब्लॉकमध्ये प्रत्येक कंपनीने 25 टक्के भागीदारी केली होती.