खालिदा झिया यांचा मृत्यूशी संघर्ष

    दिनांक :19-May-2019
- प्रकृती ढासळली 

 
ढाका,
कारागृहातील आरोग्यास अपायकारक असलेल्या वातावरणामुळे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती प्रचंड ढासळली असून, त्या मृत्यूशी संघर्ष करीत असल्याची माहिती बांगलादेश नॅशनल पार्टीने दिली आहे.
 
त्यांची तुरुंगातून तत्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी बांगलादेश नॅशनल पार्टीच्या स्थायी समितीचे सदस्य जमिरुद्दिन सरकार यांनी केली. झिया यांचे हृदयविकारासह काही आजार बळावले असून, एकटेपणा आणि योग्य उपचारांच्या अभावामुळे त्यांची प्रकृती वेगाने ढासळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
झिया यांना भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये १० वर्षांची शिक्षा झाली आहे, तसेच मागील वर्षी फेब्रुवारीपासून त्यांना ढाक्यातील २०० वर्षे जुन्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्या मृत्यूशी संघर्ष करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अद्याप खालिदा यांना दोषी ठरवलेले नाही. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळत त्यांना तुरुंगात ठेवून मानवाधिकाराचे उल्लंघन करण्यात आले, असा आरोपही सरकार यांनी केल्याचे वृत्त येथील ढाका ट्रिब्यून वृत्तपत्राने दिले आहे. त्यांना हव्या त्या रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
झिया यांच्या उपचारासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले असले, तरी याबाबत आवश्यक ती पावले सरकारकडून उचलली गेलेली नाहीत, असा दावाहरी त्यांनी केला. त्यांची प्रकृती वेगाने ढासळत असताना उपचारासाठी त्यांना सोडले जात नाही. हा प्रकार योग्य नाही. त्यांना कधीही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधातील खटले राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत, असा आरोपही सरकार यांनी केला.