मॅन्चेस्टर सिटीला तिहेरी मुकुट

    दिनांक :19-May-2019
- इंग्लिश एफए चषक फुटबॉल
- रहिम स्टर्लिंगची हॅट्‌ट्रिक

लंडन,
मॅन्चेस्टर सिटी क्लबने इंग्लिश पुरुषांच्या फुटबॉल मोसमात प्रथमच तिहेरी मुकुटाचा मान मिळविला. वेम्बले स्टेडियममध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात रहिम स्टर्लिंगच्या शानदार हॅट्‌ट्रिकच्या जोरावर मॅन्चेस्टर सिटीने वॉटफोर्डवर सरळ 6-0 गोलने विजय नोंदवून एफए चषक जिंकले. मॅन्चेस्टरचे हे देशांतर्गत इंग्लिश मोसमातील तिसरे विजेतेपद ठरले.
 
1903 सालानंतर प्रथमच एफए चषकात अंतिम सामन्यात मोठ्या गोलफरकाने विजय नोंदविला गेला. स्टर्लिंगच्या हॅट्‌ट्रिकसह डेव्हिड सिल्व्हा, केव्हिन बुने आणि गॅब्रिएल जीजस यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविले. वॉटफोर्ड प्रथमच मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याच्या प्रतीक्षेत होता, परंतु अखेर त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
कर्णधार व्हिन्सेंट कोम्पनीचा मॅन्चेस्टर सिटीला रामराम
 
तब्बल अकरा वर्षे मॅन्चेस्टर सिटीला भरभरून ट्रॉफी जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा कर्णधार व्हिन्सेंट कोम्पनी याने या सामन्यानंतर मॅन्चेस्टर सिटी क्लबला राम-राम ठोकण्याची घोषणा केली.
 
 
 
बेल्जियमच्या 33 वर्षीय कोम्पनीने 2008 साली मॅन्चेस्टर सिटी क्लबमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 360 खेळले असून संघाला चार प्रीमियर लीग विजेतेपद, दोन एफए चषक, चार लीग चषक व दोन कम्युनिटी शिल्ड जिंकून दिले आहे.
आपल्या क्लब प्रवासादरम्यान चांगल्या काळात तसेच वाईट काळातसुद्धा मॅन्चेस्टर सिटीच्या पाठीरा‘यांनी भरपूर पाठबळ दिले. त्यांचे प्रेम कधीही विसरू शकणार नाही, असे व्हिन्सेंट कोम्पनी म्हणाला. कोम्पनीने क्लबचे मालक शेख मनसूर व व्यवस्थापक पेप ग्वार्डियेला यांचेही आभार मानले.