गडचिरोली जिल्हा बंददरम्यान नक्षल्यांकडून जाळपोळ

    दिनांक :19-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
गडचिरोली,
नक्षल्यांनी आज पुकारलेल्या जिल्हा बंदला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील वारवी(चिपरी)येथील वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली. शिवाय एटापल्ली व भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी पत्रके टाकून रस्त्यांची अडवणूक केली.
२७ एप्रिलला झालेल्या चकमकीत जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा या ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, ही चकमक खोटी होती आणि दोघींनाही पोलिसांनी यातना देऊन ठार केले, असा आरोप नक्षल्यांनी बॅनर व पत्रकांमधून केला आहे. शिवाय या घटनेच्या निषेधार्थ १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
 
 
बंदच्या पार्श्वभूमीवर, नक्षल्यांनी आज पहाटे कुरखेडा तालुक्यातील वारवी(चिपरी) येथील जंगलात वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली. घटनास्थळ पुराडा वनपरिक्षेत्रातील असून, येडापूर व कुरंडी कुपातील लाकडे तोडून ती वारवी येथील जंगलात ठेवण्यात आली होती. जंगल कामगार सहकारी संस्थांनी ही लाकडे तोडून ठेवली होती. मात्र, नक्षल्यांनी ती जाळून टाकल्याने वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नक्षल्यांनी घटनास्थळी पत्रक व बॅनर लावून त्यावर बिट कटाई करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना हाकलून लावा, जल, जंगल व जमिनीवर जनतेचा अधिकार आहे, असा मजकूर लिहिला आहे.
 
दरम्यान एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्लीपासून काही अंतरावर नक्षल्यांनी काही दिवसांपूर्वी जाळपोळ केलेल्या ट्रक जवळ झाडे तोडून टाकली. बॅनर बांधून आलापल्ली-एटापल्ली रस्ता अडविला आहे. सध्या रस्ता सुरळीत सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच भामरागड जवळील पर्लकोटा नदीजवळ बॅनर बांधले आहे. 

 
 
नक्षल्यांनी झाडे तोडून रस्ता अडविलेल्या ठिकाणी बॅनर बांधले आहेत. या बॅनरवर २७ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीचा उल्लेख केला आहे. नक्षली कमांडर रामको नरोटे आणि शिल्पा धुर्वा यांना गुंडूरवाही येथे खोटी चकमक दाखवून सी - ६० पथकाने ठार केल्याचे बॅनरवर नमुद केले आहे. बॅनर मराठी भाषेतून असल्यामुळे हे कृत्य शहरी नक्षलवाद्यांचे असल्याचे बोलल्या जात आहे. बंददरम्यान नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्यात आले आहे. अतिदुर्गम आणि सिमावर्ती भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नक्षल्यांच्या कृत्यामुळे दुर्गम भागातील विकासकामे ठप्प पडली आहेत.