ब्रिटनमध्ये नवा शस्त्र कायदा; शिखांना कृपाणाचा अधिकार कायम

    दिनांक :19-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
लंडन,
ब्रिटन सरकारने शस्त्रास्त्रांबाबत नवीन कायदा मंजूर केला आहे. यामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात शिख बांधवांना पारंपारिक कृपाण जवळ बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे. “द ऑफेन्सिव्ह वेपन बील’ नावाचे हे विधेयक गेल्या आठवड्यात राजघराण्याच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आले होते. त्याला मंजूरी मिळाली आहे.

 
ब्रिटनमध्ये चाकूच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्या गुन्ह्यांना रोखण्यासठी नवीन कायदा करण्याची गरज निर्माण झाली होती. गुरुवारी या दुरुस्ती विधेयकाला महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची मंजूरी मिळाली आहे. गेल्या वर्षी मंजूर झालेल्या कायद्यामध्ये या विधेयकामुळे दुरुस्ती करण्यात आली आहे. ब्रिटनमधील शिख समुदायाला धार्मिक शस्त्र असलेल्या कृपाण किंवा तलवार बरोबर बाळगण्यास या कायद्यामुळे कोणताही अटकाव केला जाणार नाही, अशी माहिती ब्रिटनच्या गृहमंत्रालयच्य प्रवक्‍त्यांनी सांगितले.
ब्रिटनच्या संसदेतील सर्वपक्षीय शिखांच्या गटाने ब्रिटनच्या गृहमंत्रालयाला निवेदन देऊन कृपाणला या नवीन कायद्यातून वगळण्यची विनंती केली होती. त्यानुसार दुरुस्ती विधेयकात शिखांचे कृपाण वगळण्यात आले आहे. मात्र तसे झाले नसते, तर शिख समाजाल गुन्हेगार समजले जायला लागले असते.