ऑस्ट्रेलियात पंतप्रधान मॉरिसन यांच्या नेतृत्वातील आघाडी विजयी

    दिनांक :19-May-2019
बिल शॉर्टन यांचा मजूर पक्षनेतेपदाचा राजीनामा 
 
 
मेलबर्न,
ऑस्ट्रेलियात विद्यमान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या सत्ताधारी हुजूर (कॉन्झर्व्हेटिव्ह) पक्षाच्या नेतृत्वातील आघाडीने विजय मिळवला आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे सर्व अंदाज फोल ठरवीत, 51 वर्षीय स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वातील आघाडीने हा विजय मिळवला आहे, हे उल्लेखनीय. मतदानोत्तर चाचण्यांनी मजूर पक्षाला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविला होता.
 
दरम्यान, मजूर पक्षाचे नेते बिल शॉर्टन यांनी हा निकाल स्वीकारला असून, मजूर पक्ष सत्ता स्थापन करू शकणार नाही, असे ते पक्षाच्या सदस्यांना संबोधित करताना म्हणाले. त्यांनी सत्ताधारी पक्षाचे नेते आणि पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना अभिनंदनाचा दूरध्वनी केला. त्यानंतर शॉर्टन यांनी मजूर पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.
 
या निवडणुकीत एक कोटी 60 लाख मतदारांनी देशाचे 31वे पंतप्रधान निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला. हवावान बदलाच्या मुद्याभोवती ही निवडणूक एकवटली होती. स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वातील आघाडीला 74 जागा मिळाल्या असून, मजूर पक्षाला 66 जागा मिळाल्यात. 151 सदस्यीय सभागृहात साध्या बहुमतासाठी 76 सदस्यांची आवश्यकता आहे. कुठल्या दोन अपक्ष सदस्यांची मदत मॉरिसन घेतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियातील मतदारांचे आणि विरोधकांचे आभार मानले असून, चमत्कारावर आपला विश्वास आहे, असे ते म्हणाले. मॉरिसन हे नऊ महिन्यांपूर्वी पंतप्रधान झाले होते. त्यांच्या आधी माल्कम टर्नबुल हे पंतप्रधान होते. दरम्यान, विरोधी पक्ष बिल शॉर्टन यांनी आपल्या प्रचाराच्या काळात अनेक आश्वासने दिली होती. देशात धोरणात्मक बदल केले जातील, असा प्रचार त्यांनी केला होता.