हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिले सर्जिकल स्ट्राईक!

    दिनांक :19-May-2019
शिवदीपस्तंभ  
डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490
 
मागील लेखात आपण बघितले की- शास्ताखानाविरुद्ध महाराजांनी निर्णायक आघाडी उघडली. लाल महालावर छापा घालण्याचा विचार मुकर्रर करण्यात आला. 1000 मावळ्यांपैकी निवडक 400-450 मावळे राजांच्या सांगाती राहणार होते. चैत्र शु. अष्टमीला (5 एप्रिल 1663) रात्रीच्या अंधारात ही सेना पुण्यात दाखल व्हावयाची होती. ही जशी रामनवमीच्या आधीची रात्र होती तशीच ती पवित्र रमझानमधली छटा चांदची (सहाव्या चंद्राची) रात्र होती. इस्लाममध्ये मान्यता आहे की या महिन्यात सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतरच जेवण घ्यावयाचे, दिवसभर काहीही खायचे नाही. दिवसभर काहीही खाल्ले नसल्याने सैनिक सायंकाळी पोटभर जेवत असत व त्यामुळेच गाढ झोपी जात असत.
 
शास्ताखानाची छावणी पुण्यात पडून तीन वर्षे होत आलेली होती. खानाच्या सैन्याचा आकडा लाखावर होता, शिवाय आजवर छावणीमध्ये काहीही आगळीक झालेली नव्हती. त्यामुळे सारी छावणी नेहमीसारखी निश्चिन्त होती. गुप्तचर यंत्रणांनी आधीच एक महत्त्वाची बातमी आणली होती की रोज एका विशिष्ट वेळेला पहार्‍याची पाळी बदलत असे. चौकीवरचे सैनिक आपल्या छावणीकडे व छावणीमधले सैनिक पहार्‍यावर जात असत. हीच वेळ साधून थेट लाल महालावर धडक मारताना शास्ताखानावर हल्ला करण्याची विलक्षण योजना ठरली. ही योजना महाराजांच्या अद्‌भुत, अकल्पनीय, अनाकलनीय युद्धतंत्राचा अत्युत्कृष्ट नमुना ठरणार होती का? की हे एक वेडे धाडस होते? हे तर येणारा काळच ठरविणार होता.
 
राजे निघाले, सोबत सेना होती. सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला गेला होता. खानाच्या सेनेत जसे मोगली सरदार अन सैनिक होते तसेच मराठी सरदार व सैनिकही होते. त्यामुळे सर्वांनी पोशाख अर्थातच या महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करूनच केलेला असावा. सर्वांनी एकत्र छावणीमध्ये जाणे धोक्याचे असल्याने वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये सगळे आत शिरले. कुणीही हटकले अथवा चौकशी केलीच तर सर्वांचे उत्तर तयार होतेच की आम्ही गस्तीचे सैनिक आहोत, पहारा आटोपून छावणीकडे निघालो आहे. मध्यरात्र ढळून गेली होती. हळूहळू या सर्व तुकड्या लाल महालाच्या मागील बाजूस येऊन ठेपल्या. इथला एक जुना दरवाजा खानाच्या सल्ल्यावरून चुना, माती, विटांनी बंद करण्यात आला होता. कच्चा असल्या कारणाने मराठ्यांनी तो दरवाजा धक्के मारून पाडून टाकला अन ते आत प्रविष्ट झाले. पण इतक्यात त्यांचे लक्ष गेले ते स्वयंपाकाच्या तयारीमध्ये लागलेल्या आचार्‍यांकडेे.
 
रमझानचा महिना असल्याने व सूर्योदयापूर्वी जेवण तयार ठेवायचे असल्याने हे आचारी आधीच कामाला लागले होते. त्यांना मारतो म्हटलं तर ते बिचारे गरीब जीव, त्यांची काय चूक. अन्‌ त्यांच्या देखत आक्रमण करतो म्हटलं तर ते आरडाओरड करणार हे निश्चित होते. एकदा गलका झाला तर सगळेच सावध होतील व मग सगळी योजनाच फिस्कटेल. जीव जाईल तो तर वेगळाच. आणि त्यानंतर पुन्हा असा छापा घालणे अशक्य होऊन बसेल. विचार करायला उसंत नव्हती, त्या आचार्‍यांना मारणे आता आपद्धर्म होऊन बसला होता. काही इलाज उरला नसल्याने राजांच्या माणसांनी त्यांना कापून काढले. तरी त्यांची हत्या करतांना जो काही आवाज व्हायचा तो झालाच. त्यामुळे गस्तीच्या लोकांपैकी एक पहारेकरी सावध झाला व दौडत शास्ताखानाच्या कक्षात पोचला. त्याने खानाला उठवले व सांगितले की मागे काही गडबड ऐकू येते आहे. पण साखरझोपेत विघ्न आणले म्हणून खान त्याच्यावरच खेकसला अन्‌ म्हणाला, अरे मूर्खा, स्वयंपाकासाठी आचारी जागे झाले असतील. चले जाओ यहांसे, सारी निंद खराब कर दी. खाली मान घालून तो सेवक तसाच निघून गेला.
 

 
 
राजांच्या लोकांनी फारच तिखट हमला केला होता, दिसेल त्याला मराठे कापत सुटले. थोड्याच वेळात त्यांनी सगळे पहारे मारून काढले. पण त्यामुळे जो गोंधळ उडाला त्यामध्ये महालातील सर्व दासी, सेवक, स्त्रिया व खानासकट त्याचा सर्व जनाना जागा झाला. सगळीकडे एकच कोलाहल माजला, वाट फुटेल तिकडे सगळे पळत सुटले. एवढ्यात काही मराठे मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले व त्यांनी दरवाजा आतून बंद करून टाकला. आणि प्रवेशद्वारावर जे नौबती झडविणारे झोपले होते त्यांना उठवले व तलवारीच्या टोकावर त्यांना नौबती वाजविण्यास भाग पाडले. औरंगजेबाच्या राज्यारोहणाच्या वाढदिवसाचा भाग म्हणून या नौबती रोजच झडत असल्याने मोगलांच्या ते अंगवळणी पडले होते. आतला हमला तर इतका भयानक होता की लोक मदतीसाठी सैरावैरा पळत सुटले होते. महिलांच्या आरोळ्यांनी सगळा लालमहाल भरून गेला होता. नौबतींच्या गदारोळातही हा कोलाहल बाहेर पोचत होता. बाहेरून काही लोकांनी शिडी लावून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण आत उडी घेताच सावध मराठ्यांनी त्याचे मुंडके उडविले.
 
खानाचा मुलगा अबुल फतेह खान हा सुद्धा तिथेच होता, पण या धामधुमीमध्ये तोही मारला गेला. स्वतः खान लढण्यासाठी धनुष्यबाण घेऊन सरसावला. त्याची अन्‌ राजांची नजरानजर झाली आणि तो घाबरलाच. तो आत पळत सुटला, स्वतः राजे त्याच्यामागे लागले होते. जणूकाही काळच खानाचा पाठलाग करत होता. पण खानाच्या बायकांनी जरा हुशारी दाखविली व सर्व शमादाने अन समया विझवून टाकल्यात. त्यामुळे सर्वत्र अंधार झाला, पण राजे चाहूल घेऊन खानाच्या मागावर होतेच. एका अंधार्‍या कोपर्‍यात खान सापडलेला पाहून राजांच्या तलवारीचा जबरदस्त तडाखा पडला अन्‌ खान किंचाळला. खानाची परिस्थिती पाहून त्याच्या बिब्याही ओरडल्या. खान मारला गेला, राजांचे काम झालेले होते. राजांनी सर्वांना पिछारतीचा इशारा दिला, सर्व मागे हटले. मुख्य प्रवेशद्वाराच्या कड्या उघडून सगळे आजूबाजूच्या कक्षांमध्ये लपून बसले. दरवाजे उघडताच हजारो लोक आत शिरले, मशालींच्या उजेडात त्यांना आत जे दृश्य दिसले त्यामुळे त्यांचे डोळेच विस्फारले. आतापर्यंत सामसूम असलेल्या लाल महालात अचानक काय घडले होते कुणालाही कळेना.
 
अनेक लोकं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, काही विव्हळत होते, प्रेतं पसरली होती, रक्ता-मासाचा सडा पडला होता, वातावरण भयाण अन बीभत्स झाले होते. कुणाला काहीही कळत नव्हते, समजत नव्हते. महालातले लोकं धास्तावून पळत सुटले होते, ते ओरडत होते दुश्मन, दुश्मन, भागो, भागो. बाहेरून आलेल्या लोकांनाही काय करावे ते कळेना, राजे आणि त्यांची माणसे ही त्या गर्दीत शिरली. आपली माणसे ही ओरडायला लागली दुश्मन, दुश्मन, भागो, भागो. मोगली गलथानपणाचा फायदा घेत आपली माणसे आल्या पावलांनी बाहेरही पडली पण कुणालाही कळले नाही. राजांची सहा माणसे या छाप्यात कामी आली, पण खानाची पंचावन्न माणसे राजांनी मारली. यात खानाच्या काही बायकाही मारल्या गेल्यात, अंधारामुळे मराठ्यांनी तलवारी फिरविल्यात आणि त्यात त्या अपघाताने मारल्या गेल्यात. मराठे पसार झालेले होते, राजेही सिंहगडाकडे निघून गेले होते. एक अद्भुत योजना यशस्वी झाली होती. दुसर्‍या दिवशी सिंहगडावर राजांना समजले की खान मारल्या गेला नाही, राजांनी अंधारात काढलेला वार त्याच्या हातावर बसला आणि तीन बोटे तेवढी छाटल्या गेली. राजांची सकारात्मकता पहा, त्याही परिस्थिमध्ये ते म्हणालेत की बादशाहने मोठ्या कौतुकाने त्याचे नाव शास्ताखान ठेवले होते, आज त्याला शास्त (शिक्षा) करून आम्ही त्याचे नाव सार्थकी लावले.
 
महाराजांचा हल्ला इतका जबरदस्त होता की खानाला धडकीच भरली. मराठे सैतान आहेत याची त्याला खात्रीच पटली. त्याने इतकी दहशत घेतली की अवघ्या तीन दिवसांत त्याने पुण्याला राम राम ठोकला. महाराज जरी खानाचा वध करू शकले नसले तरी खानाच्या पुणे सोडून जाण्याने त्यांचा महत्त्वाचा हेतू साध्य झालेला होता. खानाच्या जाचातून स्वराज्याला मुक्ती मिळाली होती.
 
आज आपण ज्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिन्ग स्किल म्हणतो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. आज प्रश्न कुणापुढे नाहीत? अभ्यास करतांना विद्यार्थ्यांपुढे, नोकरी करताना नोकरदारांपुढे, धंदा करताना व्यवसायिकांपुढे, घर सांभाळताना गृहस्थापुढे व मुलांना सांभाळताना आईपुढे प्रश्न सातत्याने येत असतात. या प्रश्नांपासून पळायचे नसते तर त्यांची उत्तरे शोधता आले पाहिजे. त्यासाठी आपल्या हाती काय आहे आणि काय नाही याची व्यवस्थित माहिती हवी. नक्की काय करायचे याची स्पष्टता आवश्यक असते, जसे इथे खानाच्या जाचातून स्वराज्याला मुक्त करायचे हे ठरले होते. एकदा ध्येय निश्चित झाले की मग त्या प्रश्नासंबंधी बारीक सारीक माहिती गोळा करावी लागते. त्या प्रश्नांची/ शत्रू पक्षाची/ स्पर्धकाची बलस्थाने माहिती करून घ्यावी लागतात. यासोबतच त्यांचे कच्चे दुवे सुद्धा शोधून काढावे लागतात. हा कच्चा दुवाच अनेकवेळा यश प्रदान करत असतो. प्राप्त माहितीच्या आधारावर आपली योजना कागदावर आणावी लागते.
 
काही अनपेक्षित उप-प्रश्न देखील उपस्थित होऊ शकतात, त्याला तात्काळ तोडगा शोधता आला पाहिजे. इथे आचार्‍यांसंबंधी जो निर्णय घ्यावा लागला ते या उप-प्रश्नाचे उदाहरण म्हणता येईल. त्यात कुणाची मदत घ्यावी, कोण कुठल्या कामात तरबेज आहे, कुणाला कुठली कामगिरी करताना जास्त आनंद होतो, असे आपल्या सहकार्‍यांची पारख व गुणावगुण माहिती असणे ही तितकेच आवश्यक असते. सगळीच माणसे सगळ्याच परिस्थितीमध्ये चांगले काम करतील असा अट्टाहास नको. काही माणसे काही विशिष्ट कामे अन परिस्थितीसाठीच बनली असतात, त्यांचा योग्य वेळी योग्य वापर करणे हे नेतृत्वाचे कसब मानले जाते. अशा प्रकारे सर्व शक्तीनिशी मुख्य प्रश्नावर मात करावी लागते. हे सगळं करतांना दुर्दम्य आत्मवविश्वास व सकारात्मकता मनी धरावी लागते. अशा प्रकारे जो जो प्रयत्न करेल त्याला यशच प्राप्त होत असते. आपण आजही शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊ शकतो. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजांनी असाध्य ते साध्य करून दाखवले. त्या काळातल्या सर्व पातशाह्यांसाठी हा एक प्रचंड झटका होता. अखिल हिंदुस्थानच्या इतिहासातील हे पाहिलं सर्जिकल स्ट्राईक होतं. होय, शत्रूच्या घरात घुसून केलेलं पाहिलं सर्जिकल स्ट्राईक!
 
(लेखक कार्पोरेट आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक आहेत.)
••