पर्शियन आखातात प्रवासी विमानांना धोका

    दिनांक :19-May-2019
- इराणसोबतचा तणावामुळे अमेरिकन मुत्सद्यांचा इशारा 

 
 
तभा ऑनलाईन टीम  
दुबई,
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान, पर्शियन आखातातील वातावरण तापू लागले आहे. पर्शियाच्या आखातावरून जाणार्‍या प्रवासी विमानांना संकटांना तोंड द्यावे लागू शकते, असा इशारा अमेरिकेच्या मुत्सद्यांनी दिला आहे. आखाती देशांमध्ये अमेरिकेच्या विमानांना सहजपणे लक्ष्य करता येऊ शकते, असे इराणने म्हटल्यावर हा इशारा देण्यात आला आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सागरी मार्ग बंद करण्याची धकमी इराणकडून वारंवार दिली जात आहे, हे येथे उल्लेखनीय. सध्याच्या अमेरिका-इराणयामधील तणावामुळे सदर क्षेत्राच्या जागतिक हवाई वाहतुकीसमोर निर्माण झालेल्या जोखिमीचा उल्लेख अमेरिकेच्या मुत्सद्यांनी केला आहे. पर्शियाचे आखात आणि ओमानच्या उपसागरावरून जाणार्‍या सर्व विमानांना वाढलेल्या सैन्य हालचाली आणि राजनैतिक तणावाबद्दल सतर्क राहण्याची गरज असल्याचे कुवैत आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या मुत्सद्यांनी म्हटले आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या प्रशासनाने इराणसोबतच्या अणुकरारातून अंग काढून घेतले आहे. तसेच, इराणवर नव्याने कठोर निर्बंध लादले आहेत. इराणची अर्थव्यवस्था निर्बंधांमुळे मेटाकुटीस आली आहे. ट्रम्प हे इराणसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे एकीकडे म्हटले जात आहे, तर इराण मात्र, चर्चा करण्यास तयार नसल्याचे म्हटले जात आहे.