जे आहोत, ते तर आधी होऊ द्या

    दिनांक :19-May-2019
डॉ. मनमोहन वैद्य 
भारताची जीवनदृष्टी (View of Life) जगात वैशिष्ट्यपूर्ण (Unique) आहे. कारण या जीवनदृष्टीचा आधार आध्यात्मिक (Spirituality) आहे. आणि म्हणूनच ही दृष्टी एकात्म व सर्वांगीणही आहे. याच कारणामुळे भारत सत्याचे अनेक रूपं पाहतो, त्यापर्यंत पोहचण्याचे मार्ग वेगवेगळे असले तरीही ते सर्व समान आहेत, हे मानतो. यामुळेच तो अनेकतेत एकता बघतो आणि विविधतेत ऐक्य प्रस्थापित करू शकतो. तो विविधतेला भेद समजत नाही. प्रत्येक व्यक्तीत, चराचरात एकच आत्मतत्त्व विद्यमान आहे, म्हणून आम्ही सर्व परस्परांशी जुळलेलो (संबंधित) आहोत, हे भारत मानतो. या ‘संबंधाची’ अनुभूती करणे, या संबंधाचा परिघ विस्तारत नेणे आणि आपलेपणाचा विस्तार वाढवत आपलेपणाच्या भावाने दुसर्‍यांसाठी काही करणे, यालाच येथे धर्म म्हटले गेले आहे. हा धर्म जो ‘रिलिजन’हून वेगळा आहे, तो सर्वांना जोडतो, कुणालाच वगळत नाही.
 
भारताच्या या जीवनदृष्टीला जगात 'हिंदू जीवनदृष्टी’ नावाने ओळखले गेले आणि म्हणून ही भारतातील सर्व लोकांची ओळख बनली आहे. मग त्यांची भाषा, जात, प्रांत किंवा उपासना पंथ (रिलिजन) कुठलाही असो, ते सर्व या एकात्म आणि सर्वांगीण जीवनदृष्टीला आपले मानतात, त्याच्याशी आपले नाते जोडतात. म्हणून भारतात राहणार्‍या सर्वांची हिंदू ही ओळख बनली आहे. असे हिंदू होणे म्हणजे 'हिंदुत्व' भारतातील सर्वांना आपसात जोडते, एकतेचा अनुभव देते. संघसंस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी भारतातील विविध भाषा, जाती, उपासना पंथ आणि प्रांतांतील लोकांमध्ये एकतेचा भाव जागृत करण्यासाठी याच हिंदुत्वाला आधार बनविला आणि सर्वांना या हिंदुत्वाच्या आधारावर जोडून संघटित करण्याचे कार्य प्रारंभ केले. 
 
 
परंतु, आपापल्या राजकीय व निहित स्वार्थासाठी जे लोक या समाजाला जाती, भाषा, प्रांत किंवा रिलिजनच्या नावावर विभागलेलाच राहू इच्छित होते त्या सर्वांनी या 'हिंदुत्वा’ला सांप्रदायिक, प्रतिगामी, विभाजनकारी, अल्पसंख्यविरोधी इत्यादी इत्यादी दूषणे देत, हिंदुत्वाचा आणि संघाचा सर्वशक्तिनिशी विरोध करणे सुरू केले. हिंदुत्वाचे अग्रणी स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती सारख्या अनेक संत-महापुरुषांनाही हीच सारी दूषणे लावून त्यांच्या कार्यांना नाकारण्याचा, विरोध करण्याचा खटाटोप सुरू झाला.
 
परंतु, हिंदुत्वाचा शाश्वत आधार घेत चाललेले संघकार्य या सर्वांच्या विरोधानंतरही आणि या सर्वांच्या इच्छेविरुद्ध वाढतच गेले, व्यापक होत गेले. नंतर याच विरोधकांनी स्वत:च्या स्वार्थामुळे आपल्या भूमिकेत थोडे परिवर्तन करीत असे म्हणणे सुरू केले की, हिंदुत्व तर मान्य आहे; परंतु एक मवाळ (सॉफ्ट) हिंदुत्व आहे आणि दुसरे जहाल (हार्ड) हिंदुत्व आहे. स्वामी विवेकानंदांचे हिंदुत्व मवाळ आहे, जे योग्य आहे; परंतु संघाचे जहाल हिंदुत्व आहे, जे निंदनीय आहे. याच टोळीतून एक पुस्तक लिहिण्यात आले- ‘Why I am not a Hindu‘. परंतु, हिंदुत्वाचा प्रसार आणि स्वीकार समाजाच्या सहकार्याने वाढतच गेला. नंतर याच टोळीतून दुसरे पुस्तक लिहिले गेले- ‘Why I am Hindu‘. हिंदुत्वाचा स्वीकार आणि विस्तार सातत्याने वाढतच गेला. कारण तो भारताचा आत्मा आहे, भारताच्या मनातले गूज आहे.
 
नंतर याच निहित स्वार्थी तत्त्वांनी, 'हिंदुइझम’ चांगले आहे, परंतु 'हिंदुत्व’ वाईट आहे, कारण की ते सांप्रदायिक, प्रतिगामी व अल्पसंख्यविरोधी आहे, असा भ्रम पसरविणे सुरू केले. एका मीडिया संस्थेने या दरम्यान मला प्रश्न विचारला की, हिंदुइझम वहिंदुत्व यात काय फरक आहे. मी म्हटले, दोन्हीही एकच आहे. एक इंग्रजी, तर दुसरा हिंदी शब्द आहे. गुलाब व रोझ (Rose) यात जेवढा फरक आहे, तेवढाच या दोन शब्दांत आहे. डॉक्टर राधाकृष्णन्‌ यांचे ‘Hindu view of Life‘ हे पुस्तक त्यांनी इंग्रजीत लिहिले, म्हणून त्यांनी 'हिंदुइझम’ शब्द वापरला. त्यांचे पुस्तक जर हिंदीत असते तर त्यांनी 'हिंदुत्व’ शब्दच वापरला असता. सावरकरांनी त्यांचे 'हिंदुत्व’ पुस्तक मराठीच्या ऐवजी इंग्रजीत लिहिले असते तर त्यांनी कदाचित 'हिंदुइझम’ शब्दाचा वापर केला असता. खरेतर, माझे व्यक्तिगत मानणे आहे की, हिंदुत्वाचा योग्य इंग्रजी अनुवाद 'हिंदुइझम’ नसून तो हिंदुनेस (Hinduness) असला पाहिजे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी, दिल्लीच्या विज्ञान भवनात मागे दिलेल्या तीन दिवसीय व्याख्यानमालेत, हिंदू आणि हिंदुत्व शब्दांना पुरेशा विस्ताराने स्पष्ट केले आहे. परंतु, सत्य जाणण्याऐवजी ज्यांना खोट्याचाच प्रचार करायचा आहे, ते याकडे लक्ष देणार नाहीत. भारतात खरा वैचारिक संघर्ष भारतातील दोन वेगळ्या धारणांमध्ये आहे. एक, भारताची भारतीय धारणा आहे, ज्याची मुळे प्राचीन अध्यात्मआधारित जीवनदृष्टीमुळे खोलवर जुळलेली आहेत आणि दुसरी भारताची अभारतीय अवधारणा आहे, ज्यांची प्रतिके व प्रेरणास्रोत भारताबाहेरचे आहेत.
 
राजकीय नेता बनलेल्या एका पत्रकाराने आता आता एक विधान केले की, या निवडणुकीत हिंदू भारत (Hindu India) की हिंदुत्व भारत (Hindutva India) यांच्यात निवड करायची आहे. हिंदुत्वाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि विस्तारामुळेच या टोळीने हिंदू भारताची चर्चा सुरू केली आहे. यांची यात कुठलीच निष्ठा नसल्याचे दिसून येते. राजकीय दृष्टीच्या सोयीने त्यांच्या भूमिका बदलत असतात. संपूर्ण भारत हिंदुत्वामुळे एक होत असल्यामुळे यांचे जातीय, सांप्रदायिक, प्रादेशिक राजकारण कमकुवत होत आहे, यांच्या जनाधाराचे क्षरण होत आहे. त्यांना त्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी समाजाला विभागणे अनिवार्य आहे. आता जात, भाषा, रिलिजनच्या नावावर समाज विभाजित होत नसल्याचे बघून यांनी आता त्याला हिंदू व हिंदुत्वाच्या नावावर विभाजित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे त्यांच्या हिंदू प्रेमामुळे वा निष्ठेमुळे (Conviction) नसून, सोयीनुसार (Conveneince) होत असल्याचे लक्षात येईल. यांच्या फसव्या जाळ्यात अडकून चुकीचा निर्णय करण्यासाठी, भारताची भोळी दिसणारी जनता नक्कीच मूर्ख नाही आहे.
 
आणखी एका शब्दाचा वापर जाणूनबुजून भ्रम पसरविण्यासाठी करण्यात येत आहे की, हे लोक हिंदुत्ववादी अथवा हिंदुवादी आहेत. ही देखील बुद्धीला भ्रमित करणारी चाल आहे. साम्यवादी, समाजवादी, भांडवलवादी लोक तर असतात; परंतु हा हिंदुत्ववाद किंवा हिंदुवाद कुठून आला? येथे तर केवळ ‘हिंदुत्व’ आहे, जी एक ‘एकात्म आणि सर्वांगीण’ जीवनदृष्टी आहे आणि त्या दृष्टीला आपली मानणारा, तिच्या प्रकाशात आपले व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक जीवन जगणारा समाज आहे, जो 'हिंदू’ म्हटला जातो. मग हे हिंदुवादी, हिंदुत्ववादी शब्द विनाकारण भ्रम पसरविण्यासाठी का वापरले जात आहेत? यामागील कारस्थान ओळखून, याच्या प्रचाराने भ्रमित न होता, हिंदुत्वाच्या शाश्वत चिंतनाला व मूल्यांना प्रस्थापित करणे आणि आपल्या आचरणाने त्याला प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यामुळेच अनेक शतकांपासून जगाला माहीत असलेली भारताची ओळख प्रकट होईल आणि समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भारताचा पुरुषार्थ प्रकट होईल. ‘स्वदेशी समाज’ नावाच्या निबंधात रवींद्रनाथ ठाकूर लिहितात- सर्वात आधी आम्हाला, आम्ही जे आहोत ते बनणे आवश्यक आहे.
(मूळ हिंदी लेखावरून अनुवादित)
••