घटना ओलांडून बघताना...

    दिनांक :19-May-2019
मनीषा अतुल
9823262966
 
तू विचारलंस की, मला आज सारख्या त्या ज्योतीकाकू का आठवताहेत? आणि त्याचा विचार करायला गेले तर लक्षात आलं की, हे आठवण्याची लिंक फारच मोठी आहे की.
नेमकी कुठून कुठे गेली ते मलाही नीट उमगत नाहीये, पण प्रयत्न करतीये तेच शोधण्याचा. आता मी ज्या बाईंबद्दल तुला काल बोलले, त्यांच्या आणि ज्योतीकाकूंच्या आयुष्यात तसं काही साम्य नाहीच ना. पण, शोधताना सापडलं की त्या दोघींमध्येच काय, आपल्या सगळ्यांच्याच मध्ये एक खूप मोठं साम्य आहे. आपलं सगळ्यांचं वर्तन एका विशिष्ट अशा टप्प्यांनी होतं आणि टप्प्यांमध्ये विभागल्याही जातं. आणि मग त्याचे खूप सूक्ष्म तंतू जुळून आलेले दिसतात. किंबहुना ती एक थीअरीच होते तयार. असेलही अशी काही थीअरी मानसशास्त्रामध्ये, मी कुठे शिकलीये मानसशास्त्र? पण, माणसांच्या मनांशी बोलायला, विश्लेषण करायला आवडतं मला.
 
तर आता हा माझाच गोंधळ मी तुला सोपा करून सांगते बघ. काल त्या बाईंबद्दल सांगितलं ना की, त्यांचं काल तिघांशी खूप कडाक्याचं भांडण झालं. अगदी वर्षानुवर्षे त्यांच्या घरी काम करणार्‍या रुखमाबाईशी, दूधवाल्याशी आणि कोपर्‍यातल्या फुलवाल्याशीपण. कारणं अगदीच क्षुल्लक होती, पण त्या इतक्या कडाडल्या की, जसं कुणी लुटूनच नेतंय्‌ त्यांना! आता यात आश्चर्य असं किंवा सांगावं असं काही नाही रे. पण असं बघ ना की, त्या बाईंचा मूळ स्वभावच तसा नाहीये ना. त्या खूपच सालस आणि शांत स्वभावाच्या आहेत. या सगळ्यांशीच त्या फार मायेनं वागत आल्या आहेत. म्हणून या कुणी फारसं मनावर घेतलं नाही. पण आत्या बोललीच की, एवढ्यात त्या सारख्या वैतागताहेत आणि त्यांच्या वागण्यात खूपच कटुता आली आहे. सगळ्यांना जाणवण्याइतपत बदल झाला आहे त्यांच्या स्वभावात. तोही अचानक, गेल्या दोन-तीन महिन्यांत. आता त्यांचा मुलगा त्यांना सोडून बायको-पोरांना घेऊन परदेशात स्थिर झाला, याला दोन वर्षं होत आहेत खरेतर. त्या वेळी खंबीरपणे त्यांनी त्याला जवळपास हाकलूनच दिलंन घरून, त्याचा अप्पलपोटेपणा बघून. मग आताच का?
 
इकडे ज्योतीकाकूंचं बघ... पहिला नवरा लग्नानंतर दोनच वर्षांत त्यांना सोडून निघून गेला. त्यांनी पुढल्या दोन वर्षांनी लग्न केलं या दुसर्‍याशी. काकूंना चांगली नोकरी. त्याचं मात्र छोटंसं इलेक्ट्रिकच्या सामानाचं दुकान, तेही न चालणारं. केलं त्यानं लग्न. दोन मुलंही झालीत. आणि आता हा दोन्ही मुलं घेऊन गावी निघून गेला अचानक. काकूंनी पोलिसात तक्रार केली, तर पोलिस म्हणे, ‘‘बापाने मुलं नेली तर ते अपहरण कसं? तुमचा डिव्होर्स झालाय्‌ का?’’ बाई म्हणे, ‘‘नाही हो, काहीतरीच काय? खूप प्रेम करतो तो माझ्यावर.’’ पोलिस हसले. म्हणाले, ‘‘मग जावा की बोला त्यांच्याशी, इथे काय तक्रार करता?’’ तर त्या माझ्या घरी आल्या दुसर्‍या दिवशी. खूप भडक लाल जरीची साडी, चमचमता खड्यांचा सेट, मोठे इयररिंग्स, लालभडक लिपस्टिक, अगदी ओठांबाहेर फासलेलं. लहान मुली लावतात तशा दोन मोठ्या मासोळ्याच्या क्लिपा कानावर लावलेल्या. बाकी केस पाठीवर मोकळे सोडलेले आणि एका हातात मोठी पर्स अडकवून ती हलवत, दुसर्‍या हातावर पदर घेऊन चक्क गिरकी घेत, लचकत आत येत म्हणाल्या, ‘‘काय गं, कशी दिसते मी?’’ मी बघतच राहिले. त्यांना असं कधी बघितलं नाही ना?
 
डोळ्यांत प्रचंड चमक आणीत म्हणाल्या, ‘‘मी बाळांच्या बाबांना भेटायला जातेय्‌. येतील नं गं ते माझ्याबरोबर? छान दिसते नं गं मी?’’ आणि एकदम डोळे भरून आले त्यांचे. कीवच आली मला क्षणभर. ही रे कसली अगतिकता? म्हटलं, ‘‘बसा, पाणी आणते.’’ तसा माझा हात गच्च धरून सोफ्यावर बसवलं मला. नखांना लाल नेलपेंट वेडंवाकडं लावलेलं दिसलं. त्यांची नखं नेहमी कुरतडलेली असतात. नखं खाण्याची सवय आहे ना त्यांना. डोळे पुसत म्हणाल्या, ‘‘माझं नशीब की, ते कुणा दुसर्‍या बाईच्या नादी नाही लागले. मला बघताच पटकन जसे असतील नं तस्से येतील, बघच तू.’’ आणि दोनच दिवसांनी कळलं की, त्यांनी पोलिस स्टेशनला नवर्‍याविरुद्ध मारझोडीची तक्रार टाकली. पोलिसांनी रात्रभर त्याला डांबून ठेवलं. त्यानंतर एकदा रस्त्यात दिसल्या तर म्हणाल्या, ‘‘मग? करणार काय होते मी? आला का तो? उलट त्याने मला एक झापड ठेवून दिली आणि इथून निघ म्हणाला. मग मी त्याच्यासमोर ब्लाऊज फाडून बोचकारून घेतलं स्वतःला आणि गेली तशीच पोलिसकडे. आता बघ, ते अद्दल घडवतील ना, तर येईल मुकाट वापस. तसं त्याचं खूप प्रेम आहे गं माझ्यावर!’’
 
आता या दोन घटनांमध्ये काय साम्य? तर थांब. अजून दोन घटना सांगते, मग एकदम बघू. एक, माझ्या मैत्रिणीची मुलगी येतीये बंगलोरहून. 34 वर्षांची झाली, लग्नाचं नाव घेत नाहीये. मैत्रीण म्हणाली, ‘‘फिसकारतेच गं ती लग्नाचं नाव घेतलं की. म्हणते, नको मला कुणी माझ्यावर अधिकार गाजवणारं. सासर म्हटलं की छळतात सगळे. आता दुर्दैवाने माझ्या वाट्याला आलं असं हिच्या वाट्याला येणारंय का? सगळे संसार असेच असतात का?’’ दुसरी घटना आत्या मावशींची. आमच्याच कॉलनीतली. कुणी आत्या म्हणतात, कुणी मावशी, म्हणून आम्ही आत्यामावशी म्हणतो त्यांना. नवरा गेल्यापासून त्या खूप त्रास देताहेत घरात मुलांना. जसा काही मुलांचाच दोष आहे हा. मुलं कमावती आहेत म्हणून बरं. दुर्लक्ष करतात. पण, या सारख्या सहानुभूती घेण्यासाठी, माझं हे दुखतं, ते दुखतं करीत असतात. डॉक्टर म्हणतात त्यांना काही झालं नाही.
 
बरं, या सारखं निमित्त काढून बाहेर जायला बघतात. दुसर्‍या गावाला कुणाकडे लग्न-मुंजी असो की कुणी आजारी असो, या ‘गाडी कर आणि मला घेऊन चल’’ म्हणून लकडा लावतात. सुट्‌ट्या नसतात मुलांना. मग यांची रडापड आणि आदळआपट. श्वास घेऊ देत नाही कुणाला घरात! आता या सगळ्या वर्तनांचा विचार केला तर लक्षात येतं की, प्रत्येकाच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर एखादी अशी घटना घडून गेलेली आहे, ज्याचा दूरगामी परिणाम यांच्या वागण्यावर झालेला आहे. आणि तो झालेला परिणाम यांना जाणवतो आहे हे महत्त्वाचं. म्हणून पुन्हा तशी घटना घडू नये किंवा ते परिणाम परत फेस करावे लागू नये म्हणून ही सगळी माणसं आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. खरेतर प्रयत्न करणंही हाती नाही. तू म्हणतोस की, ‘‘अगं, असं बघ, ती घडलेली घटना हा एक टप्पा धरू या आणि तिथून मागे भूतकाळात गेलो, तर ती घटना घडण्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीकडे उलटा प्रवास करू. कारण कुठलीही घटना अचानक नाही घडत.
 
ती हळूहळू तयार होत असते. कधीकधी अचानक एखाद्या कृतीने ती समोर येते, एवढंच. तर हा आधीचा टप्पा म्हणजे घटना घडून गेल्यापासून वर्तमानातल्या क्षणापर्यंत. जो की घटनेच्या परिणामांचा टप्पा आहे; तर माणसाचं आताचं वर्तन हे नेहमी घटना घडल्यानंतरच्या टप्प्याने प्रभावित होत राहतं. ते घटनेच्या आधीच्या टप्प्याकडे जातच नाही. माणूस सारखा उलटा त्या घटनेपाशी जाऊन थांबतो आणि ती घटना कल्पनेत पुन:पुन्हा जगतो. तिथली तीच कटुता घेऊन त्यानंतरच्या परिणामांची उजळणी करत वर्तमानात उभा राहतो. म्हणून तो कायम त्रासलेला असतो. एकदा तरी हिंमत करून त्याने घटनेचा टप्पा ओलांडून मागे जाऊन बघायला हवे, जेव्हा सगळं छान होतं आणि नंतरच्या कटुतेच्या टप्प्याशी आल्यावर तेवढा भाग डिलीट करून, त्या ‘छान’पासून पुढे सुरुवात करून बघायला काय हरकत आहे? मात्र, हे सीमोल्लंघन वारंवार करावं लागतं, हं. कारण याबाबतीत माणसाची स्मरणशक्ती फार कमकुवत असते.’’
 
अगदी खरं बोललास. घटना ओलांडून मागे जायचं. उलट प्रवास... पण, घटनेपासून मागल्या दिशेला...
हरकत नाही. आपल्यापासूनच सुरुवात करून बघू या का?

(लेखिका साहित्यिक आहेत.)
••