उडते व्हाईट हाऊस ‘एअर फोर्स वन!’

    दिनांक :19-May-2019
कॅप्टन निलेश गायकवाड
9420286000 
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांरिता बनविलेले एक विशेष विमान म्हणजे- ‘एअर फोर्स वन!’ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत किंवा परदेशात जिथे जिथे जातात, तेव्हा ते ‘एअर फोर्स वन’ नेच प्रवास करतात किंवा असंही म्हणता येईल की- ज्या क्षणाला राष्ट्राध्यक्ष विमानात दाखल होतील, त्याला ‘एअर फोर्स वन’ संबोधिल्या जाईल. राष्ट्राध्यक्ष जर सैनिकी विमानातून प्रवास करणार असतील तर त्याला ‘आर्मी वन’ म्हंटले जाईल व हेलिकॉप्टरने जाणार असतील त्याला ‘मरीन वन’ संबोधिल्या जाईल.
 
हे शब्द एअर ट्राफिक कंट्रोलरला विशेष विमान असल्याचे सुचवण्यासाठी वापरतात. विमानाचा विचार केला तर दोन बोईंग- 747-200 बी जेट विमाने सध्या वापरात आहेत. यांना व्हीसी-25 म्हणून ओळखल्या जाते व 28000 व 29000 हे नंबर त्याच्या शेपटीवर दिसतात. चार मजली इमारत एवढे उंच भासणार्‍या या विमानांमध्ये 4 जेट इंजिने वापण्यात आली आहेत. ज्याने 1200 किमी प्रतितास इतकी गती विमानाला मिळते. हे बोईंग विमान साधारण 46000 फिट उंच उडू शकतं. याची इंधन क्षमता 50 जार ते 55 हजार सरश्रश्रेपी इतकी असते. 
 
 
या बोईंग विमानांमध्ये खालील बाजू ‘कार्गो’ म्हणजे जड-अवजड वस्तूकरिता वापरतात, तर वरचा मजला तांत्रिक उपकरणे किंवा दूरसंचार साधनांकरिता वापरतात तर मधल्या मजल्या वर प्रवासी राहू शकतील, अशी सोय असते . प्रवासी खोल्यात खान-पानाची सोय यात मधल्या मजल्यावर केलेली असते. अंदाजे 3800 स्क्वेअर फिट फ्लोअर स्पेस या जेटमध्ये असते. राष्ट्राध्यक्षाकरिता जिम, बेडरूमपासून ते भव्य ऑफिससुद्धा जेट मध्ये आहे. या व्यतिरिक्त सर्व उच्चअधिकार्‍यांचे कार्यालये, इतर कर्मचार्‍यांना कामकाज करण्याकरिता लागणारी जागा, मीडिया म्हणजे प्रसिद्धी माध्यमांच्या लोकांकरिता स्वतंत्र जागा व इतर कर्मचार्‍यांकरिता राहण्याची सोय या विमानात आहे . ‘एअर फोर्स वन’ 60 ते 70 प्रवासी व 25 खलाशीना घेऊन उडू शकते.
 
‘एअर फोर्स वन’मध्ये एकाच वेळेस 100 लोकांच्या जेवणाची सोय असते व 2000 लोकांच्या जेवण्याच्या सोयी इतकी सोय साठवून ठेवली असते. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, डॉक्टर्स पासून ते ऑपरेशन करता येणे शक्य होईल अशा सोयी या जेटमध्ये करण्यात आलेल्या आहेत. यात 90 टेलीफोन लाईन्स, 20 टीव्ही, रेडिओे उपकरणे व अत्याधुनिक संगणक प्रणाली बसविण्यात आली आहे . विमानाची रचना अशी करण्यात आली आहे, ज्याने Electro Magnetic Pulse म्हणजे विद्युत चुंबकीय लहरीपासून विमानाला कुठलीही क्षती पोहोचणार नाही .
 
या विमानाला हवेतच इंधन भरण्याची सोय असते, जेणे करून आपत्कालात हे विमान जमिनीवर इंधन भरायला उतरवावे लागणार नाही. विमानात रडार सिग्नलला चकमा देण्याकरिता आधुनिक Electronic Counter Measures (ECM) वापरले आहेत, शिवाय मिसाईल्सला चकविन्याकरिता ऋश्ररीशी सोडण्याची पण सोय यात आहे. अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक ‘एअर फोर्स वन’साठी लवकरच बोईंग 747-8 किंवा Airbus 380 वापरण्याच्या बातम्या पण प्रसिद्ध झाल्या आहेत. अमेरिकेच्या अस्मितेचा मानबिंदू  असलेल्या ’एअर फोर्स वन’ला ‘उडते व्हाईट हाउस’ पण संबोधिले जाते.
(लेखक हवाई उड्डाण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
••