जंगलातील कृत्रिम पाणवठे कोरडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

    दिनांक :19-May-2019
सोहळ काळवीट अभयारण्याच्या सोमठाणा बीट मधील प्रकार 
कारंजा - सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या सोमठाणा बीट मधील सोमठाणा घाटाच्या खालच्या बाजूस तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यात गेल्या काही महिन्यांपासुन पाणी भरण्यात आले नसल्याने जंगली प्राण्याना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची पाळी आली आहे. याबाबीकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष दिसून येत आहे.
 

 
 
 
याबाबत सविस्तर असे की, कारंजा सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या कारंजा दारव्हा मार्गावरील सोमठाणा घाटातील तीन वन तलाव गेल्या पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसात वाहून गेल्याने वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. सदर बाब लक्षात घेवून वनविभागाच्या वतीने सोमठाणा घाटातील खालच्या भागातील जंगलात युध्दपातळीवर कुपनलीका खोदून या ठिकाणी कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आला होता. या कृत्रिम पाणवठ्यात वनविभागाचे कर्मचारी नियमितपणे पाणी सुध्दा भरत होते.
मात्र, सध्यस्थितीत उन जोरात तापत असताना गेल्या काही महिन्यांपासुन वनविभागाचे या कृत्रिम पाणवठ्याकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे या पाणवठ्यात पाणी भरण्यात येत नाही. त्यामुळे पाणवठा पाण्याअभावी कोरडा राहत असल्याने वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची पाळी आली आहे. वनविभागाचे या कृत्रिम पाणवठ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे वन विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी वन्य प्राण्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेले हाल लक्षात घेता कृत्रिम पाणवठ्यात त्वरीत पाणी भरण्याची मागणी वन्यप्रेमी नागरिकांनी केली आहे.