एकट्या भाजपाला ३०० जागा

    दिनांक :19-May-2019
योगी आदित्यनाथ यांचा विश्वास
 
 गोरखपूर: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अंतिम टप्प्यात गोरखपूर येथे मतदानाचा हक्क पार पाडल्यानंतर, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, या निवडणुकीत भाजपाला किमान 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या सहकार्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला. गोरखपूर येथील एका मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर योगी आदित्यनाथ पत्रकारांशी बोलत होते. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीचा फारसा परिणाम रालोआच्या जागांवर पडणार नाही. उत्तरप्रदेशात एकट्या भाजपाला 74 जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, मतदान करण्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून गोरखपूर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे, आपणही आळस न करता मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा, असे आवाहन आदित्यनाथ यांनी टि्‌वटरवरून केले.