तिवस्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

    दिनांक :19-May-2019
बोगस डॉक्टरवर गुन्हे दाखल
 
तिवसा: तिवसा शहरात गेल्या चार वर्षांपासून अवैध रित्या बोगस पदवी दाखवून खाजगी दवाखाना चालवत असलेल्या पश्चिम बंगालच्या बोगस डॉक्टराचा पर्दाफाश शनिवारी करण्यात आला. दुपारी 1 वाजता त्याच्या दवाखान्यात धाड टाकून त्याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
 
 

 
 
येथील सराफा लाईनमध्ये गेल्या चार वर्षांपासून पश्चिम बंगाल येथील डॉ.अविकल मंडल (वय 29 वर्ष) या बोगस डॉक्टराचा साई सरकार नावाचा खाजगी दवाखाना होता. तो मूळव्याद, भगंदर, गुप्तरोग या सर्व आजारांच्या रुग्णांवर अवैधरित्या उपचार करायचा. मात्र, तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पवन मालुसरे यांनी शनिवारी त्याच्या या दवाखान्याची तिवसा पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यासह झडती घेतली असता त्याचेकडे डॉक्टरची बोगस पदवी दिसून आली. अनेक बोगस कागदपत्रे त्याचेकडे सापडली. त्यामुळे हा डॉक्टर बोगस असल्याचे दिसून आले. त्याच्या दवाखान्यातील सर्व औषधी, त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉ. पवन मालुसरे यांनी जप्त करून त्याला तिवसा पोलिसांच्या हवाली केले. वैद्यकीय अधिकारी पवन मालुसरे यांनी तिवसा पोलिस ठाण्यात त्याचेविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.