नवऱ्याच्या डोळ्यादेखत नवविवाहितेला प्रियकराने पळविले

    दिनांक :19-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
नागपूर,
नुकतेच लग्न झालेल्या एका नवविवाहितेला तिच्या पतीच्या डोळ्यादेखत प्रियकराने पळवून नेल्याची घटना गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकावर उघडकीस आली. अमोल डोंगरे इंदिरानगर, अजनी असे या प्रियकराचे नाव आहे. सुंदरा, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) येथील शिवकुमार संतराम रजक याचे २४ एप्रिल २०१९ रोजी इंदिरानगर, चनाटोली येथील नेहा नावाच्या २१ वर्षीय तरुणीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच १४ मे रोजी शिवकुमार हा नेहासोबत आपल्या सासरी नागपूरला आला होता. चार, पाच दिवस सासरी मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी तो नेहासोबत आपल्या गावाला जाण्यास निघाला.
 
 
नागपूर रेल्वेस्थानकावरील दोन क्रमांकाच्या फलाटावर तो गाडीची वाट पाहत बसला होता. काही वेळानंतर नेहाला सोडून शिवकुमार हा लघुशंकेसाठी गेला. दरम्यान, अमोल नेहाजवळ आला आणि तो तिच्याशी बोलताना शिवकुमारला दिसला. शिवकुमारने हा कोण आहे अशी विचारणा केली असता तिने भाऊ आहे असे सांगितले. त्यानंतर अमोलने गाडीला दोन तास उशीर आहे. तुम्ही बसने का जात नाही? अशी विचारणा केली. रेल्वेगाडीची वाट पाहण्याशिवाय बसने गेलेले बरे असा विचार करून शिवकुमार आणि नेहा हे अमोलच्या दुचाकीने गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक येथे आले.
 
अमोलने मी तिकीटे काढून आणतो असे बोलून तो निघून गेला. त्यानंतर नेहा लघुशंकेला जाते असे शिवकुमारला सांगून ती देखील निघून गेली. बराच वेळ झाला, तरी नेहा न आल्याने शिवकुमारने तिचा शोध घेतला. त्यावेळी अमोल आणि नेहा हे दोघेही दुचाकीने जाताना दिसून आले. शिवकुमारने ही माहिती लगेच आपल्या सासèयाला दिली. त्यानंतर गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.