बादशाहच्या गाण्यावर विल स्मिथ फिदा

    दिनांक :19-May-2019
मुंबई,
हॉलिवूड अभिनेता विल स्मिथचे बॉलिवूड प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. स्मिथचा आगामी सिनेमा 'अलादीन'मध्ये गायक बादशाहने एक गाणं गायलं आहे. 'सही है ब्रो' असं गाण्याचं नाव आहे. या गाण्याला प्रेषकांकडूनही भरपूर पसंती मिळाली आहे. त्यानंतर खुद्द अभिनेता विल स्मिथनेही एका व्हिडीओतून या गाण्याची प्रशंसा केली आहे. तो व्हिडीओ बादशाहने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
 
 
इन्स्टाग्रामवर 'बादशाह, छान काम, हे सुंदर आहे. आपण गाण्यात चित्रपटातील काही भागांचा वापर केला, तो फार मजेदार होता. आपण फार उत्तम काम केले', असे स्मिथने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. शेवटी स्मिथने बादशाहची भरपूर प्रशंसा केली. हॉलिवूड अभिनेता स्मिथकडून मिळालेल्या प्रशंसेनंतर 'तुम्ही आता एखादा बॉलिवूड सिनेमा केला पाहिजे' अशी प्रतिक्रिया बादशाहने स्मिथला दिली आहे.