चुकीच्या क्षेत्रात आले, असे मला वाटते- ऊर्मिला

    दिनांक :19-May-2019
मुंबई: मी अतिशय भावनिक आहे व लहानपणापासून मितभाषी आहे. अशी व्यक्ती राजकारणासाठी योग्य नसते, त्यामुळे मला अनेकदा असे वाटते की, मी चुकीचे क्षेत्र निवडले आहे, अशा भावना अभिनेत्री आणि कॉंगे्रसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केल्या.
 

 
 
 
एका आघाडीच्या मराठी वृत्तवाहिनीशी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. मी सुरुवातीला राजकारणात यायचे ठरवले होते आणि यासाठी कॉंग्रेसचीच निवड केली होती; पण निवडणूक लढण्याबाबत कधीच विचार केला नव्हता. वरिष्ठांनी निवडणूक लढण्यास सांगितले, त्यामुळे नकार देता आला नाही, असे त्या म्हणाल्या.
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे, असा विचार करून प्रचार केला नाही, मला लोकांमध्ये आपल स्थान निर्माण करायचे होते. त्यासाठी मी लोकांमध्ये गेले, त्यांच्याशी बोलले. त्यांच्यासाठी मी काय करू शकते, हे सांगितले, असे त्यांनी सांगितले.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी या राजकारणातील माझ्या आदर्श आहेत. मी लहानपणापासून त्यांची चाहती आहे. त्यांच्याइतकी कणखर व्यक्ती मी पाहिलेली नाही. त्यामुळे मला त्या आवडतात, असे मतही त्यांनी मांडले.
राज ठाकरेंचे मुद्दे मला पटले
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणूक काळात राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर राजकीय मंचांवर भाष्य केले, मला त्यातील सर्व मुद्दे आवडले, त्यामुळे मी राज यांना भेटले आणि निवडणुकीत त्यांचा पािंठबा देखील घेतला, असेही त्या म्हणाल्या.
निवडणूक काळात राज यांनी जी भाषणे केली, त्यात त्यांनी स्वत:चा पक्ष आणि निवडणुकीला बाजूला ठेवून, विविध मुद्दे लोकांसमोर मांडले, ते मुद्दे ऐकून मला असे वाटले की, आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीने या मुद्यांवर भाष्य का केले नाही, राज सातत्याने सरकारच्या चुकांवर आणि लोकांसाठी बोलत होते, असेही त्यांनी सांगितले.