करण जोहरला नेटकऱ्यांनी सुनावले!

    दिनांक :19-May-2019
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या बॅनरखाली बनलेला ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला. पण या आठवडाभरात या चित्रपटाने कसाबसा 57.90 कोटींचा बिझनेस केला. पण हे काय? करण जोहर सोशल मीडियावर एक मोठी घोषणा करून मोकळा झाला. ही घोषणा होती, ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ हिट झाल्याची. होय, कमाईचे आकडे शेअर करत, ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ समरटाईम हिट असल्याचा दावा त्याने केला. त्याच्या या दाव्याचे हसू झाले नसेल तर नवल. लोकांनी त्या दाव्यानंतर करणची चांगलीच फिरकी घेतली.
 
‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ समरटाईम हिट असल्याचा दावा करणने केला असला तरी प्रेक्षकांच्या मते, हा चित्रपट हिट नाही तर फ्लॉप आहे. या चित्रपटाचा बजेट होता ८० कोटींचा. असे असताना गत आठवडाभरात या चित्रपटाला ६० कोटींचाही पल्ला गाठता आला नाही. पण याचे भान न ठेवता हा चित्रपट हिट असल्याचे ट्वीट केले. लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत करणची मजा घेतली.

‘सर, स्टोरी भी तो होती है. ये फिल्म अच्छी बनती. लेकीन प्लीज स्टारकिड्स को लॉन्च करने के लिए फिल्में मत बनाइए,’असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरनेही करणला अशाच भाषेत सुनावले. ‘आम्ही घामाच्या पैशाने तिकिट खरेदी करतो. आमचा पैसा लॉन्चिंग आणि बीच कॉस्च्युम दाखवण्यावर व्यर्थ घालवू नकोस,’ असे या युजरने लिहिले. धर्मा प्रॉडक्शनचा हा सलग दुसरा सिनेमा फ्लॉप ठरला आहे. याआधी वरूण धवन, आलिया भट स्टारर ‘कलंक’ हा सिनेमा असाच आपटला. १५० कोटींच्या या चित्रपटाने कसेबसे ८० कोटी कमावले होते.