मनी ट्रान्सफरच्या व्यवहारात चौघांना १२ लाखांनी गंडविले

    दिनांक :19-May-2019
 
ओबेटॅब कंपनीच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
 
तिवसा: मनी ट्रान्सफरच्या व्यवहारात ओबेटॅब ई सोल्यूशन कंपनीने मोझरी, वरुड व अमरावतीच्या चौघांची 12 लाख 61 हजार 572 रुपयाने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुकुंज मोझरी येथील विश्वनाथ पाटील यांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी ओबेटॅब कंपनीच्या 9 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, ओबेटॅब ही चेन्नई येथील एक फायनान्स कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून मनी ट्रान्सफरचे देवाण-घेवाणचे ऑनलाईन व्यवहार चालतात. त्यासाठी काही रक्कम कंपनीकडे जमा ठेवावी लागते. कंपनीकडे लाखो रुपये ऑनलाईन जमा करून हे व्यवहार चालत होते; मात्र अलीकडेच फेब्रुवारी 2019 मध्ये लाखो रुपये कंपनीकडे जमा असूनही व्यवहार होत नसल्याची बाब गुरुकुंज मोझरी येथील साईकृपा हॉटेलचे संचालक विश्वनाथ शंकर पाटील यांच्या लक्षात आली. त्यांना खाते क्रमांकही देण्यात आला होता. काही महिने सुरळीत व्यवहार चालल्यानंतर अचानक व्यवहार ठप्प झाल्याने त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. कंपनीकडे याबाबत पाठपुरावा केला असता त्यांनी नव्याने खाते उघडावे लागेल व त्यात 50 हजार जमा करावे लागेल, अशी बतावणी केली. मात्र पूर्वीच 2 लाख 79 हजार कंपनीकडे जमा असल्याने त्यांनी उर्वरित रक्कम कंपनीकडे जमा केली. मात्र त्यानंतरही व्यवहार सुरळीत सुरु न झाल्याने त्यांनी याबाबत पाठपुरावा केला असता त्यांना याबाबत उडवाउडवीची उत्तरे कंपनीने दिली. रक्कम परत मागितली असता ते देण्यासही टाळाटाळ केल्याने त्यांनी कंपनीशी जुळलेल्या वरुड व अमरावती येथील काही लोकांशी संपर्क साधला असता त्यांच्या सोबतही असाच प्रकार घडल्याचे त्यांनी विश्वनाथ पाटील यांना सांगितले.
त्यामध्ये विश्वनाथ पाटील यांची 3 लाख 29 हजार 701 रुपये, वरुड येथील प्रफुल काळे यांची 1 लाख 7 हजाराने, अमरावती येथील निलेश सुरडकर यांची 3 लाख 43 हजार 658 रुपयाने तर मोहम्मद जावेद यांची 2 लाख 35 हजार रुपये अशी चौघांची एकूण 12 लाख 61 हजार 572 रुपयाने कंपनीकडून फसवणूक झाल्याने याबाबतची तक्रार विश्वनाथ पाटील यांनी तिवसा पोलिसांत दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी ओबेटॅब कंपनीच्या 9 अधिकारी व अन्य काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.