रामदास बोट दुर्घटनेचे साक्षीदार विश्वनाथ मुकादम कालवश

    दिनांक :19-May-2019
 
 
अलिबाग: तब्बल 60 वर्षांपूर्वी अरबी समुद्रातील रामदास बोट अपघातात वाचलेले एकमेव व्यक्ती आणि घटनेचे साक्षीदार विश्वनाथ मुकादम उर्फ बारक्याशेठ यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. बोटीला झालेल्या अपघातामुळे सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. परंतु, मुकादम यांना पोहता येत त्यांनी सुरक्षितपणे समुद्रकिनारा गाठला होता.
विश्वनाथ मुकादम यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या समुद्रात घडलेल्या टायटॅनिक सदृश्य अपघाताचा इतिहास सांगणारे व्यक्ती जगातून निघून गेले. मुकादम यांच्यामुळेच रामदास बोट अपघाताचा उलगडा झाला होता, हे विशेष.
 
 
 
असा झाला अपघात...
सुमारे 60 वर्षांपूर्वी म्हणजे 17 जुलै 1947 गुरुवार रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी वाजता एसएस रामदास ही बोट मुंबईच्या धक्क्यावरून रायगडजवळच्या रेवस बंदराकडे निघाली. बोटीत जवळपास 750 पेक्षा अधिक माणसे होती. शेख सुलेमान इब्राहिम हे बोटीचे कॅप्टन होते. यात प्रवाशांसह कामगार आणि खलाशांचा समावेश होता. यापैकी बहुतांश लोक पनवेल, गिरगांव, परळ, रोहा, अलिबाग येथील होते.
मुंबईचा किनारा सोडल्यानंतर पाच मैल म्हणजेच आठ किलोमीटर अंतरावर कुलाबा पॉईंट परिसरात काशाच्या खडकाजवळ (गल आयलंड) बोट पोहचली आणि वातावरणात अचानक बदल झाला. पावसाचे दिवस असल्याने समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्या. यावेळी रामदास बोट लाटांच्यामध्ये आल्याने तिला जलसमाधी मिळाली. बोट बुडत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात येताच प्रत्येकाने जीव वाचवण्यासाठी आटापिटा केला. परंतु, बोटीवरील 750 पेक्षा अधिक प्रवांशापैकी काही मोजक्या प्रवाशांना मासेमार्‍यांच्या मदतीने आपला जीव वाचवता आला. तर इतर प्रवाशांना बोटीसोबत जलसमाधी मिळाली होती. जीव वाचलेल्या मोजक्या प्रवाशांपैकी एक म्हणजेच विश्वनाथ मुकादम उर्फ बारकुशेठ हे होते. त्यावेळेस विश्वनाथ वयाने फारच लहान होते. पोहता येत असल्याने त्यांनी जीवाच्या आकांताने पोहून समुद्रकिनारी पोहचले होते.