अमरावती जिल्ह्यात फक्त १९.३० टक्के जलसाठा शिल्लक
   दिनांक :02-May-2019
 
जलसाठ्यात पहिल्यांदा विक्रमी घट
 
अमरावती: जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये शिल्लक असलेल्या पाण्याचा साप्ताहीक आढावा गुरूवार 2 मे रोजी घेण्यात आला. या प्रकल्पांमध्ये एकूण 19.30 टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात अप्पर वर्धा हा मोठा तर शहानूर, चंद्रभागा, पूर्णा व सपन हे चार मध्यम व 80 लघु असे एकूण 85 प्रकल्प आहे. या प्रकल्पांमध्ये गुरूवार 2 मे पर्यंत 178.67 द.ल.घ.मी पाणी शिल्लक आहे. त्याची टक्केवारी 19.30 आहे. मागील आडवड्यात 183.26 द.ल.घ.मी. पाणीसाठा प्रकल्पांमध्ये होता. सात दिवसात तो 5 टक्क्याने कमी झाला आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी याच तारखेला प्रकल्पांमध्ये 314.93 द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक होता. त्याची टक्केवारी 34.02 होती. 2014 ते 2017 या चार वर्षात प्रकल्पांचा जलसाठा चांगला होता. गेल्या अनेक वर्षात यंदा पहिल्यांदा जिल्ह्यातल्या प्रकल्पांचा जलसाठा फारच कमी झाला आहे. कमी पर्ज्यन्यमान हे त्या पाठीमागचे प्रमुख कारण आहे.
 

 
 
गुरूवार 2 मे पर्यंत अप्पर वर्धा धरणात 100.47 द.ल.घ.मी. पाणी शिल्लक असून त्यांची टक्केवारी 17.81 आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या शहानूर धरणात 17.50 द.ल.घ.मी., चंद्रभागा प्रकल्पात 15.33 द.ल.घ.मी., पूर्णा धरणात 9.82 द.ल.घ.मी., सपन प्रकल्पात 18.46 द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे. 80 लघु प्रकल्पांमध्ये सरासरी 17.09 द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे. तापमानातली तीव्रता कायम राहील्यास पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. प्रशासन काय उपायोजना करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.