मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोना विजयी

    दिनांक :02-May-2019
बार्सिलोना, 
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर स्पॅनिश क्लब असलेल्या एफसी बार्सिलोना संघाने काल रात्री युरोपियन चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातील पहिल्या चरणात लिव्हरपूल संघाचा 3-0 असा सहज व एकतर्फी पराभव केला.
 
मेस्सीने इंग्लिश क्लब असलेल्या लिव्हरपूल संघाविरुद्धचा एक गोल तर 25 गज दूरून फ्री किकवर इतका जोरकसपणे हाणला की चेंडू थेट जाळ्यात जाऊन स्थिरावला. कॅम्प नाऊ येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात लिव्हरपूल संघाची सुरुवात चांगली व दमदार झाली. पाहुण्या संघाने पहिल्या मिनिटाला आक्रमक पवित्रा घेत जोरदार हल्ला चढविला. त्यांनी दोन्ही फळीमधून आक‘मण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्याचा फायदा घेता आला नाही. बार्सिलोनाने मात्र मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घेतला.
  
 
सामन्याच्या 26 व्या मिनिटाला जॉर्डी आल्बा याने डाव्या फळीतून 18 गजच्या चौकटीत क्रॉस पास दिला आणि कोणतीही चूक न करता स्ट्रायकर लुईस सुआरेज याने आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. 4 एप्रिल 2018 नंतर या स्पर्धेतील सुआरेजचा हा पहिला गोल ठरला. मध्यंतरासाठी खेळ थांबायला काही मिनिटे शिल्लक असताना लिव्हरपूलचा फॉरवर्ड सादियो माने याला एक चांगली संधी मिळाली. मात्र, चेंडू पायात आल्यानंतर अचूक फटका हाणण्याऐवजी त्याने हाणलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टच्या वरून बाहेर निघून गेला.
 
लिव्हरपूल संघाने उत्तरार्धातील खेळाला चांगली सुरुवात केली. असे वाटत होते की ते पुन्हा सामन्यात परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी फॉरवर्ड मोहम्मद सलाह आणि मिडफिल्डर जेम्स मिल्नर यांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या. मात्र, तरीही त्यांना आपल्या संघाला बरोबरी साधून देता आली नाही.
 
सामन्याच्या 75 व्या मिनिटाला बार्सिलोनाने एक जोरदार हल्ला चढविला आणि मेस्सीने गोल करून यजमान संघाची आघाडी दुप्पटीने वाढविली. त्यानंतर मात्र लिव्हरपूलचा संघ माघारतच गेला. 82 व्या मिनिटाला बार्सिलोना संघाला फ‘ी किक मिळाली त्यावर मेस्सीने अचूक गोल करून आपल्या संघाचा विजय निश्चित केला. अखेर बार्सिलोना संघाने 3-0 अशा एकतर्फी भक्कम आघाडीसह पहिल्या चरणाचा उपांत्य सामना िंजकून अंतिम फेरीतील आपल्या आशा मजबूत केल्या आहेत.
दोन्ही संघांतील दुसरा चरणाचा उपांत्य सामना एनफिल्ड येथे 8 मे रोजी खेळला जाणार आहे.