पत्रकारावर खवळला अक्षय कुमार
   दिनांक :02-May-2019
मुंबई,
लोकसभेच्या रणधुमाळीत अनेक बॉलिवूडकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. परंतु, या सगळ्यापासून अभिनेता अक्षय कुमार मात्र लांबच होता. देशाच्या राजकारणाविषयी भूमिका घेत ट्विट करणाऱ्या अक्षयने निवडणुकीत मतदान का केलं नाही असा प्रश्न त्याला अलीकडेच एका पत्रकारानं विचारला. परंतु, बॉलिवूडचा 'खिलाडी' कुमार त्याला विचारलेला हा प्रश्न मात्र फारसा खिलाडू वृत्तीनं घेताना दिसला नाही. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
 
 
अक्षय कुमार ब्लँक चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गेला असताना त्याला पत्रकारांनी वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारले. त्यात, एका पत्रकाराने मतदानाचा विषय काढला. 'देशातली जनता तुझ्यावर प्रचंड प्रेम करते, परंतु, तुला ट्रोलही केले गेले. तू मतदान करताना दिसला नाहीस' पत्रकाराचा प्रश्न संपण्याच्या आतच अक्षयनं 'चलिए, बेटा...चलिए' म्हणत पत्रकाराला गप्प केले आणि तिथून काढता पाय घेतला. मतदान न केल्यामुळे ट्रोल होणारा अक्षय या व्हिडिओमुळे टीकेचे लक्ष्य होतोय.
अक्षयनं मतदान का केलं नाही याबद्दल त्याला सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यात आले. अक्षयचा जन्म जरी पंजाबमधील अमृतसर येथे झाला असला तरीही अधिकृतरित्या तो भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असून कॅनडाने त्याला तिकडचे नागरिकत्व दिले आहे. भारतीय नियमाप्रमाणे दोन देशांचे नागरिकत्व ठेवण्यास कोणत्याही नागरिकाला मान्यता नाही. त्यामुळे अक्षयनं भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून कॅनडाचे नागरिकत्व अबाधित ठेवले. त्यामुळे 'खिलाडी' कुमारला भारतात मतदान करण्याचा अधिकार नाही.