आसाराम बापूच्या बायोपिकमध्ये झळकणार आलिया आणि अनुष्का?
   दिनांक :02-May-2019
जोधपूरच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूच्या आयुष्यावर निर्माते सुनील बोहरा बायोपिक बनवणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असणार याविषयी लेखक आणि पत्रकार उशीनर मजूमदार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
 
 
पत्रकार उशीनर मजूमदार यांच्या 'गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू' या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असणार आहे. आसूमल हरपलानी ते स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू हा प्रवास कसा झाला इथपासून ते बलात्काराच्या आरोपावरील खटला कसा चालला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा कशी मिळाली या सगळ्या गोष्टी बायोपिकमध्ये असणार आहेत. त्यामुळे या बायोपिकमध्ये आसारामची भूमिका कोणता अभिनेता साकारू शकेल ? असा प्रश्न उशीनर मजूमदार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना मजूमदार म्हणाले की, 'या चित्रपटाने आसारामचे आयुष्य दाखवण्यापेक्षा त्याला जेलमध्ये पोहचवणाऱ्या शोभा भुताडे आणि चंचल मिश्रा या दोघींवर चित्रपटाच्या कथेत भर दिला पाहिजे असं मला वाटते. या दोन्ही महिलांच्या भूमिकांमध्ये सशक्त अभिनय करणाऱ्या अभिनेत्री पाहिजेत. अनुष्का शर्मा आणि आलिया भट्ट या दोघी भूमिकांसाठी उत्तम निवड असतील' असं ते म्हणाले.
'गॅग्स ऑफ वासेपूर', 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' यांसारख्या चित्रपटाचे निर्माते सुनील बोहरा यांनी गेल्या महिन्यात बोहरा यांनी या पुस्तकाचे सर्व हक्क विकत घेतले आहेत. सध्या ते लेखकांना भेटत असून लवकरच स्क्रिप्टवर काम सुरू करणार आहेत. त्यानंतर चित्रपटातील कलाकारांची नावं निश्चित होतील.